हवाहवाई ! मोठ्या विमानांसाठी छत्रपती संभाजीनगर होणार सज्ज, विस्तारीकरणाला वेग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:38 IST2025-12-11T19:36:47+5:302025-12-11T19:38:13+5:30
विस्तारीकरणात धावपट्टी मोठी झाल्यानंतर अधिक क्षमतेची विमाने येथे उतरू शकतील, ज्यामुळे शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत मोठी वाढ होईल.

हवाहवाई ! मोठ्या विमानांसाठी छत्रपती संभाजीनगर होणार सज्ज, विस्तारीकरणाला वेग
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३९ एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादनासाठी ८७.८२ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास मंगळवारी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. विमानतळाच्या विस्तारीकरणात प्रामुख्याने धावपट्टीची लांबी वाढणार आहे. यातून मोठ्या विमानांच्या उड्डाणांसाठी विमानतळ सज्ज होईल.
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चिकलठाणा, मुकुंदवाडी, मुर्तुजापूरमधील ५६.२५ हेक्टर म्हणजेच १३९ एकरांत विस्तारीकरण होणार आहे. या विस्तारीकरणासाठी जमीन संपादित करण्यासाठी आणि त्यापोटी होणाऱ्या ५७८.४५ कोटी रुपयांच्या खर्चास नोव्हेंबर २०२३ मध्ये शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली होती. टप्प्याटप्यात निधी मिळत आहे. निधीचा मार्ग मोकळा होत असल्याने विस्तारीकरणाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. नव्या वर्षात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
विस्तारीकरणात धावपट्टी मोठी झाल्यानंतर अधिक क्षमतेची विमाने येथे उतरू शकतील, ज्यामुळे शहराच्या हवाई कनेक्टिव्हिटीत मोठी वाढ होईल. विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा, तसेच अधिक प्रवासी क्षमतेच्या विमानांची ये-जा होईल. यामुळे मराठवाड्यातील हवाई वाहतुकीला नवे बळ मिळेल, तसेच गुंतवणूक आणि पर्यटनाच्या संधींनाही चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
धावपट्टीची स्थिती...
- विमानतळाची धावपट्टी सध्या ९ हजार ३०० फूट लांबीची आहे. सध्या छोट्या आणि मध्यम आकाराची विमाने उड्डाण करीत आहेत.
- जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या जम्बो विमानांच्या उड्डाण करण्यासाठी १२ हजार फुटांच्या धावपट्टीची गरज राहणार आहे.
- त्यानुसार १२ हजार फुटांपर्यंत धावपट्टी विस्तारीकरणाचा प्रस्ताव असून, २७०० फुटांसाठी भूसंपादनाची गरज आहे. ८२५ मीटर लांबीची धावपट्टी नव्याने होणार आहे.
भूसंपादनाची नोटीस निघेल
‘१९ अ’प्रमाणे भूसंपादनाची नोटीस पुढच्या आठवड्यात निघेल. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल.
- व्यंकट राठोड, उपविभागीय तथा भूसंपादन अधिकारी