मनपाचे पथविक्रेता धोरण ठरेना; ४,५०० हातगाड्या जप्त, हॉकर्स बांधवांनी पोट कसे भरावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:55 IST2025-01-14T17:55:07+5:302025-01-14T17:55:46+5:30
मनपाचे अजब धोरण : गरीब हातगाडी चालक विविध राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांकडे हातगाडी मिळवून द्या म्हणून आग्रह धरतात. त्यांच्या विनंतीलाही मनपा प्रशासन मान द्यायला तयार नाही.

मनपाचे पथविक्रेता धोरण ठरेना; ४,५०० हातगाड्या जप्त, हॉकर्स बांधवांनी पोट कसे भरावे?
छत्रपती संभाजीनगर : शासन आदेशानंतरही महापालिका प्रशासन पथविक्रेत्यांसाठी धोरण आखायला तयार नाही. रस्त्याच्या कडेला विविध साहित्य विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ४ हजार ५०० पथविक्रेत्यांच्या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. विशेष बाब म्हणजे दंड लावून हातगाड्या परत देण्याचा नियम असतानाही त्या परत दिल्या नाहीत. अत्यंत गरीब हातगाडी चालक आजही आपली गाडी मिळावी म्हणून मनपा मुख्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी आपल्या शटरपासून पाच ते दहा फुटांपर्यंत अतिक्रमण केले आहे. त्यानंतर रस्त्यावर हातगाड्या उभ्या असतात. त्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय, ही वस्तुस्थिती आहे. अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. मागील वर्षभरात महापालिकेने साडेचार हजार हातगाड्या जप्त केल्या. त्यामुळे शहरातील रस्ते मोकळे झाले का? शहर हॉकर्स फ्री झाले का? तर अजिबात नाही. शहरातील अतिक्रमणांच्या मुद्यावर दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अलीकडेच टीका केली होती. त्यानंतरही मनपाने कोणतेही धोरण निश्चित केले नाही.
शासनाने दहा वर्षांपूर्वी मनपाला पथविक्रेता धोरण निश्चित करण्याचे आदेश दिले. शासन आदेशानुसार कारवाई करीत आहोत याचा देखावा करण्यासाठी पथविक्रेत्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण केले. १४ हजार ५०० पथविक्रेत्यांची नोंद झाली. त्यानंतर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट मागील वर्षीपासून रस्त्यावर पथविक्रेता दिसला तर सामानासह हातगाडी जप्त करण्यात येते. हातगाडी चालकांनी गल्लीबोळात फिरून व्यवसाय करावा, असा अजब सल्ला मनपाकडून देण्यात येतोय.
माजी नगरसेवकांनाही दाद नाही
गरीब हातगाडी चालक विविध राजकीय पक्षांच्या माजी नगरसेवकांकडे हातगाडी मिळवून द्या म्हणून आग्रह धरतात. त्यांच्या विनंतीलाही मनपा प्रशासन मान द्यायला तयार नाही. प्रशासन ऐकायला तयार नाही, म्हणून अनेक माजी नगरसेवकांनी विनंती करणेही सोडून दिले. हेच माजी नगरसेवक भविष्यात निवडून आल्यावर नियमांवर बोट ठेवतील, तेव्हा प्रशासनाची पळताभुई थोडी होईल.
दंड आकारून हातगाडी द्यावी
रस्त्यावर उभे चारचाकी वाहन जप्त केले तर परत देणार नाही, हातगाडी जप्त केली तर देणार नाही, हे धोरण चुकीचे आहे. यापूर्वी हातगाड्यांचा चेंदामेंदा करण्याचे फर्मान मनपाने सोडले होते. हे सुद्धा नियमाला अनुसरून नाही. मनपाने फेरीवाला धोरण आखावे.
- भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक.