छावणीतील विनापरवानगी होर्डिंग्जची तपासणी
By Admin | Updated: January 7, 2015 01:04 IST2015-01-07T00:39:03+5:302015-01-07T01:04:46+5:30
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विनापरवानगी होर्डिंग्ज आणि कमानी लावून आचारसंहिता धाब्यावर बसवली गेल्याचे लोकमतने समोर आणल्यानंतर छावणी परिषदेचे प्रशासन जागे झाले.

छावणीतील विनापरवानगी होर्डिंग्जची तपासणी
औरंगाबाद : छावणी परिषदेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विनापरवानगी होर्डिंग्ज आणि कमानी लावून आचारसंहिता धाब्यावर बसवली गेल्याचे लोकमतने समोर आणल्यानंतर छावणी परिषदेचे प्रशासन जागे झाले. आचारसंहिताभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी परिषदेने होर्डिंग्ज आणि कमानींची तपासणी सुरू केली आहे. गल्लोगल्ली जाऊन परिषदेचे कर्मचारी कुणी-कुणी आणि कुठे विनापरवानगी होर्डिंग्ज लावले याची माहिती जमा करीत आहेत.
छावणीत उमेदवारांनी निवडणूक विभागाची परवानगी न घेताच प्रचाराच्या शेकडो कमानी, होर्डिंग्ज आणि झेंडे लावले आहेत. तसेच घराघरांवर स्टीकर्स आणि पोस्टर्सही चिकटविले जात आहेत. याविषयी लोकमतने काल वृत्त प्रकाशित केले. आचारसंहिताभंगाची गंभीर बाब लक्षात आल्यानंतर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आता याकडे लक्ष दिले आहे.
आचारसंहिताभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करता यावी यासाठी परिषदेने छावणीत होर्डिंग्ज आणि कमानींच्या सर्वेक्षणास सुरुवात केली आहे. छावणी परिषदेच्या निवडणुकीत यावेळी तब्बल ४६ उमेदवार रिंगणात आहेत. यातील जवळपास सर्वच उमेदवारांनी मोठमोठे होर्डिंग्ज आणि कमानी लावल्या आहेत. विशेष म्हणजे धार्मिक स्थळांच्या परिसरातही प्रचाराच्या होर्डिंग्जचे पीक आले आहे.