लॉन्सच्या पार्किंगची कागदपत्रे तपासा
By Admin | Updated: July 7, 2017 01:15 IST2017-07-07T01:08:02+5:302017-07-07T01:15:42+5:30
औरंगाबाद :रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या लॉन्स, मंगल कार्यालयांची कागदपत्रे तपासून दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करा, अशा सूचना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी जनता-पोलीस संवाद कार्यक्रमात दिल्या

लॉन्सच्या पार्किंगची कागदपत्रे तपासा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा, देवळाई, बीड बायपास रोडवर लॉन्स व मंगल कार्यालयांची संख्या अधिक आहे. रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या लॉन्स, मंगल कार्यालयांची कागदपत्रे तपासून दोषी आढळल्यास गुन्हे दाखल करा, अशा सूचना पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी जनता-पोलीस संवाद कार्यक्रमात दिल्या.
पैठण रोड महानुभाव आश्रम पोलीस चौकी ते बीड बायपास देवळाई चौक व झाल्टा फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा विविध लॉन्स आहेत. किमान १५ च्या जवळपास ही संख्या पोहोचली आहे. लग्नसराईत रस्त्यावर वाहतूक कोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. अशा प्रसंगी दवाखान्यात रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेलादेखील अनेकदा रस्ता मोकळा करून दिला जात नाही; परंतु लॉन्स अथवा मंगल कार्यालयांत वाहन पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था असणे गरजेचे असतानाही बायपासवरच वाहनांची अवैध पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो.
सातारा- देवळाईत लाखाच्या जवळपास लोकसंख्या असून, कामावर ये-जा करणे कठीण झाले आहे. मंगल कार्यालयांनी स्वत:ची स्वतंत्र पार्किंग करून धोका टाळावा, अशी मागणी जनता दरबारात केली होती. त्यानुसार पोेलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी जनतेला होत असलेल्या अडचणी टाळण्यासाठी लॉन्स व मंगल कार्यालयांचा सर्व्हे करून त्यांची रीतसर लॉन्स, पार्किंगची जागा तपासा तसेच वाहतुकीला अडथळा ठरत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक भारत काकडे यांना दिल्या आहेत. विचारमंचावर पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त गायकवाड यांची उपस्थिती होती.