पीएमडी कंपनीच्या माध्यमातून फसवणूक
By Admin | Updated: June 26, 2014 00:38 IST2014-06-26T00:27:19+5:302014-06-26T00:38:42+5:30
पाथरी : दहा - छत्तीस महिन्यात रक्कम दुप्पट व पाचपट करून देतो म्हणून पीएमडी नावाच्या एका कंपनीद्वारे शेकडो जणांची फसवणूक करून करोडोची माया जमा केली.

पीएमडी कंपनीच्या माध्यमातून फसवणूक
पाथरी : दहा - छत्तीस महिन्यात रक्कम दुप्पट व पाचपट करून देतो म्हणून पीएमडी नावाच्या एका कंपनीद्वारे शेकडो जणांची फसवणूक करून करोडोची माया जमा केली. गुंतवणूक केलेले पैसे परत मिळत नसल्याने अखेर एक जणाच्या तक्रारीवरून या कंपनीच्या मालकासह १० जणांच्या विरोधात पाथरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदरील कंपनीच्या मालकाने लोकाचा पैशासाठी तगादा लागल्याने पाथरी येथील कार्यालय बंद करून महिनाभरापूर्वीच पोबारा केला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पाथरी शहरात ५ जून २०१२ रोजी पीएमडी नावाने दहा, आठरा आणि छत्तीस महिन्यात रक्कम गुंतविल्यास दुप्पट, तीनपट आणि पाचपट रक्कम देण्याचे अमिष दाखवून या भागातील शेकडो ग्राहकांकडून करोडो रुपयांची माया जमा केली. सुरुवातीच्या काळात गुंतवणुकदारांना काही रक्कम परतही दिली. परंतु पुढील कालावधीमध्ये गुंतवणुकदारांना रक्कम परत मिळत नसल्याने मागील दोन महिन्यांपासून पीएमडी कंपनीच्या मालकाकडे ग्राहकांना तगादा लावला होता. ग्राहकांचा वाढता दबाव पाहता कंपनीचे मालकाने पाथरी येथील कार्यालय अचानक बंद करून पाथरीतून पोबारा केला. तक्रार दाखल झाल्यानंतर पीएमडी कंपनीचे मालक मुंजाजी डुकरे (रा. खेडुळा) याच्यासह रंजना मुंजाजी डुकरे, कृष्णा मुरलीधर अजूब, मळीराम श्रीरंग डुकरे, आसाराम बालासाहेब ढोणे, बळीराम बाबासाहेब ढोणे, श्रीकृष्ण मळीराम डुकरे, गंगाधर पांडुरंग गिराम, भीमराव बेंडगे आणि प्रल्हाद आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर पाथरी येथील कंपनीच्या कार्यालयामध्ये धाड टाकली परंतु या कार्यालयाला कुलूप आढळून आले. (वार्ताहर)
फसवणूक झाल्याची दिली तक्रार
२५ जून रोजी याबाबत ३ लाख ३३ हजार रुपयांचे फसवणूक झाली म्हणून माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील मारोती वचिष्ट कोरडे यांनी पाथरी पोलिसात तक्रार दिल्यावरून दहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.