कडब्यापेक्षा ज्वारी स्वस्त
By Admin | Updated: April 20, 2015 00:36 IST2015-04-20T00:19:58+5:302015-04-20T00:36:26+5:30
राजेश खराडे , बीड यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर ज्वारीचे दरही घटले आहेत. ज्वारीला १५०० ते २२०० रू प्रति क्विंटल दर आहे

कडब्यापेक्षा ज्वारी स्वस्त
राजेश खराडे , बीड
यंदा पाण्याअभावी रब्बी हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. घटत्या उत्पादनाबरोबर ज्वारीचे दरही घटले आहेत. ज्वारीला १५०० ते २२०० रू प्रति क्विंटल दर आहे. तर कडबा २५०० रुपये शेकड्यावर जाऊन पोहचलाय.
सध्या रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी अंतिम टप्प्यात आहे. आर्थिक अडचणीत सापडलेला बळीराजा खळ्यावरील ज्वारी लगेच आडतीवर घालीत असल्याने गेल्या पंधरवाड्यात ज्वारीची आवक तिपटीने वाढली आहे. परिणामी आवक वाढल्याने ज्वारीच्या दराची घसरण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीपाबरोबर रब्बी हे दोन्ही हंगाम गेले. उत्पन्नातून उत्पादनावर केलेला खर्चही निघाला नाही. जिल्ह्यात रब्बी हंगामातील ज्वारी या प्रमुख पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. एक ना अनेक समस्यांचा सामना करीत शेवटी ज्वारीचे अल्पशा प्रमाणात का होईना उत्पादन झाले आहे. एकरी ८ पोत्याचा उतारा ३ पोत्यावरच येऊन ठेपल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून शेती व्यवसायातून बळीराजाला आर्थिक फटकाच अधिक प्रमाणात बसला आहे. सध्या लग्नसराई व दरडोईच्या खर्चापोटी शेतकरी शेतीमाल डायरेक्ट बाजारपेठेत आणून विक्री करीत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी हंगामातील सर्वच पिकांची आवक वाढली आहे. जानेवारी महिन्यात ज्वारीच्या केवळ ४ ते ५ पोत्याची आवक होत होती. उत्पादन हाती लागताच येथील बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्याभरापासून ज्वारीची ३०० ते ४०० पोत्यांची तर गव्हाची ७० ते ८० पोत्यांची आवक होत आहे. वाढत्या अवकाळीचा परिणाम दरावर झाला असून उत्पादन अल्प प्रमाणात झाले असले तरी शेतकऱ्यांनी विक्रीची घाई गडबड केल्याने ज्वारीला १६०० रु. क्विंटल तर गव्हाला २५०० रु क्विंटल दर मिळत आहे. आवक घटताच दरात वाढ होणार असून शेतकऱ्यांनी शेतीमाल विकण्याची गडबड करू नये, असा सल्ला जिल्हा गुणनियंत्रक रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.
अन बाजार समिती गजबजली
खरीप हंगामातील उत्पादनाची आवक झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून बीड कृषी उत्पन्न बाजार समिती ओसाड पडली हाती. गेल्या पंधरवाड्यापासून रब्बी हंगामातील बाजरी, गहू, हरभरा आदी पिकांची आवक वाढल्याने समिती परिसरात दुपारी १२ पर्यंत सौदे होऊ लागले आहेत. चौसाळा, राजुरी, पिंपळनेर, मांजरसुंबा, पाली भागातील शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.