विभागाच्या पीक पद्धतीत आमूलाग्र बदल
By Admin | Updated: May 27, 2016 23:31 IST2016-05-27T23:12:37+5:302016-05-27T23:31:01+5:30
सुनील कच्छवे, औरंगाबाद पंधरा-वीस वर्षांत मराठवाड्यातील पीक पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. अन्नधान्याऐवजी शेतकरी नगदी पिकांकडे वळल्यामुळे सूर्यफूल, करडई ही पिके मराठवाड्यातून जवळपास बाद झाली आहेत.

विभागाच्या पीक पद्धतीत आमूलाग्र बदल
सुनील कच्छवे, औरंगाबाद
पंधरा-वीस वर्षांत मराठवाड्यातील पीक पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. अन्नधान्याऐवजी शेतकरी नगदी पिकांकडे वळल्यामुळे सूर्यफूल, करडई ही पिके मराठवाड्यातून जवळपास बाद झाली आहेत. ज्वारी, गहू, भुईमूग या पिकांचे क्षेत्रही कमी झाले. दुसरीकडे कपाशी आणि सोयाबीनच्या क्षेत्रात कित्येक पटींनी वाढ झाली आहे, अशी माहिती विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी दिली. बदललेल्या पीक पॅटर्नमुळे उत्पादन खर्च आणि रिस्क फॅक्टर वाढला आहे. शिवाय खत, बियाणे या गोष्टींसाठी शेतकऱ्यांचे बाजारावरील अवलंबित्वही वाढले आहे. या सर्व कारणांमुळेच येथील शेतकरी अडचणीत आले आहेत, असेही ते म्हणाले.
कृषी सहसंचालक कार्यालयातील विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी गुरुवारी लोकमत कार्यालयास भेट दिली. या भेटीत त्यांनी खरीप हंगाम, खते, बियाणांची उपलब्धता, पीक पद्धती, कडधान्य विकास कार्यक्रम, पंतप्रधान पीक विमा योजना, पर्जन्यमान आदी विषयांवर संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने खते आणि बियाणांचे पुरेसे नियोजन केले आहे. त्यामुळे विभागात खते बियाणांची अजिबात टंचाई भासणार नाही, असा दावाही त्यांनी केला. लोणारे यांनी मागच्या १५-२० वर्षांतील खरीप आणि रबी हंगामातील पिकाचे क्षेत्र, त्यातील बदल, त्याचा परिणाम याचे आकडेवारीसह विवेचन केले. त्यांनी मांडलेली मते पुढीलप्रमाणे.
३० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट
फळ पिकांचे क्षेत्र वाढविण्यासाठी विभागात विशेष मोहीम घेण्यात येत आहे. त्या अंतर्गत मराठवाड्यात यंदा ३० हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्याचे काम केले जाईल. प्रत्येक कृषी सहायकाला दहा हेक्टर क्षेत्रावर फळ पीक लागवडीचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे.
भारी जमीन आणि पाणी असेल तरच बीटीची लागवड करा
मराठवाड्यात शेतकरी बीटी कपाशीच्या मागे लागले आहेत. अगदी हलक्या जमिनीतही बीटीची लागवड केली जात आहे. खरे तर बीटी कपाशी हे मध्यम आणि भारी जमिनीत येणारे पीक आहे. तसेच या वाणासाठी भरपूर पाण्याचीही गरज असते. हलक्या जमिनीत आणि पाण्याची सोय नसलेल्या ठिकाणी बीटीची लागवड योग्य नाही. त्यामुळे उत्पादन खर्च तर वाढतोच; परंतु योग्य प्रमाणात उत्पादनही मिळत नाही. म्हणून चांगली जमीन आणि पाण्याची सोय असेल तरच शेतकऱ्यांनी बीटी कपाशीची लागवड करावी, अन्यथा देशी कपाशी किंवा इतर पीक घ्यावे.
पाच वर्षेच समाधानकारक पाऊस
मराठवाड्यात गेल्या १२ वर्षांत केवळ पाच वर्षेच सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे, तर २००४, २००७, २००८, २०११, २०१२, २०१४ आणि २०१५ या सात वर्षांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मागील पाच वर्षांचाच विचार केला तर त्यातील चार वर्षे खूपच कमी पाऊस झालेला आहे. त्यावरून पर्जन्यमानातही बदल झाल्याचे दिसत आहे.
पशुधनावरही परिणाम
पीक क्षेत्रातील बदलाचे अनेक परिणाम झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरीचे क्षेत्र कमी झाल्यामुळे चाऱ्याची उपलब्धता कमी झाली आहे. त्याचा परिणाम पशुधनाच्या संख्येत घट होण्यात झाला आहे. दुसरीकडे कडधान्य आणि गळती धान्य पिके कमी झाल्यामुळे सेंद्रिय खताची उपलब्धता कमी झाली आहे. पिकांच्या उत्पादन खर्चात वाढ, पर्यायाने निव्वळ नफा कमी झाला आहे. पिकास लागणाऱ्या निविष्ठासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्र आणि कंपनी यांच्यावर अवलंबून झाला आहे.
देशी कपाशी हा उत्तम पर्याय...
मराठवाड्यात अलीकडच्या काळात कपाशीचे क्षेत्र खूप वाढले आहे. त्यातही शेतकरी केवळ बीटीची लागवड करीत आहेत; परंतु हे चुकीचे आहे. कपाशीच लावायची असेल तर हलक्या आणि कोरडवाहू जमिनीसाठी देशी कपाशी हाच उत्तम पर्याय आहे. शेतकऱ्यांनी हलक्या जमिनीत बीटीऐवजी देशी कपाशीची लागवड करावी. जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल, तसेच देशी कपाशीत पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे कमी पाऊस झाला किंवा पावसात खंड पडला तरी उत्पादनात फारसे नुकसान होणार नाही.
शासनाने चालू वर्ष कडधान्य वर्ष म्हणून जाहीर केलेले आहे. त्यामुळे कृषी विभागाने मराठवाड्यात यंदा तूर, मूग, उडीद पिकांचे ३ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र आंतरपिकांच्या माध्यमातून वाढविण्याचे नियोजन केले आहे, तसेच हलक्या जमिनीवरील बीटी कापूस क्षेत्र कमी करून ७३ हजार हेक्टर क्षेत्रावर देशी कापसाची लागवड केली जाणार आहे. सोयाबीन क्षेत्रावर रबी हंगामात हरभरा पिकाचे नियोजन केले आहे.