मुंबईच्या 'बेस्ट' धर्तीवर छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट बससाठी ‘चलो ॲप’
By मुजीब देवणीकर | Updated: August 18, 2023 19:22 IST2023-08-18T19:21:19+5:302023-08-18T19:22:22+5:30
९० बस विविध मार्गांवर धावत असून, प्रवाशांकडून मात्र अद्यापही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

मुंबईच्या 'बेस्ट' धर्तीवर छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट बससाठी ‘चलो ॲप’
छत्रपती संभाजीनगर : कोट्यवधी रुपये खर्च करून स्मार्ट सिटी प्रशासनाने शहर बससेवा सुरू केली. ९० बस विविध मार्गांवर धावत असून, प्रवाशांकडून मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीने मुंबईच्या बेस्ट बससेवेच्या धर्तीवर ‘चलो ॲप’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी कार्यालयात एक बैठक झाली. बैठकीत स्मार्ट शहर बससेवेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी ‘चलो ॲप’ सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. स्मार्ट सिटीच्या एका पथकाने मुंबई दौरा केला. बेस्ट बससेवेत ‘चलो ॲप’ची यंत्रणा आणि वापर याचे अवलोकन केले. प्रिया सिंग यांनी ‘चलो ॲप’बद्दल एक सादरीकरण केले. प्रशासकांनी काही सुधारणा सुचविल्या. बैठकीस स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, व्यवस्थापक राम पवनीकर, विश्लेषक सागर इंगळे, प्रकल्प व्यवस्थापक फैज अली, ऋषिकेश इंगळे उपस्थित होते.
ॲपमध्ये काेणत्या सुविधा?
‘चलो ॲप’मध्ये प्रवाशांना लाइव्ह बस ट्रॅकिंग, बसमध्ये जागेची उपलब्धता, चलो कार्ड मार्फत ‘टच ॲन्ड पे’ त्यात विविध सवलती मिळतील. या ॲपद्वारे बससेवेचा दर्जा वाढवून प्रवासी संख्या वाढविण्याचा उद्देश आहे. ॲप स्मार्ट बस प्रशासनाला व्यवस्थापन पॅनल उपलब्ध करून देईल, बसचे वेळापत्रक व अन्य बाबींचे नियोजन करणे अधिक सोपे जाईल.