आमदार फंडामुळे कार्यकर्त्यात चैतन्य
By Admin | Updated: January 21, 2015 01:08 IST2015-01-21T01:03:46+5:302015-01-21T01:08:49+5:30
उस्मानाबाद : स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी अनुज्ञेय असलेल्या २ कोटीच्या निधी खर्चास मान्यता मिळाली आहे

आमदार फंडामुळे कार्यकर्त्यात चैतन्य
उस्मानाबाद : स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी अनुज्ञेय असलेल्या २ कोटीच्या निधी खर्चास मान्यता मिळाली आहे. त्यातच प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ५० लाखाचा अतिरिक्त निधी म्हणून मंजूर झाला आहे. त्यामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे २०१३-१४ या आर्थिक वर्षात प्रत्यार्पित झालेला १ कोटी ४० लाख ९८ हजाराचा निधीही चालू वर्षात खर्च करण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
विधानसभा निवडणुका होवून तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी आमदारांसाठीचा स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गतचा निधी प्राप्त झालेला नव्हता. त्यामुळे लोकप्रतिनिधीसह कार्यकर्त्यातही निरुत्साह होता. विधानसभा निवडणुकीत बहुतांश सर्वच आमदारांनी ग्रामस्थ तसेच गावपुढाऱ्यांना त्यांच्या गावातील विविध कामे मार्गी लावण्याची आश्वासने दिली आहेत. निवडणूक निकालानंतर अशा ग्रामस्थांनी तसेच तेथील गावपुढाऱ्यांनी सदर विकास कामांसाठी आमदारांकडे रेटा लावला होता. मात्र निधी मंजूर नसल्याने या कामांची प्रक्रिया काहीशी थंडावली होती. उशिराने का होईना स्थानिक विकास कार्यक्रमासाठी निधी प्राप्त होत असून, ५० लाखाच्या वाढीव निधीची बंपर लॉटरी लागल्याने कार्यकर्त्यात उत्साह वाढला आहे.