निळवंडे प्रकल्पासाठी २२३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीस केंद्र शासनाची परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:25 IST2019-02-28T23:25:02+5:302019-02-28T23:25:34+5:30
निळवंडे प्रकल्पासाठी २२३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीस केंद्र शासनाच्या गुंतवणूक मान्यता समितीने परवानगी दिली आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करावयाचा आहे, असे २५ फेब्रुवारी २०१९ चे पत्र आणि बैठकीचा कार्य अहवाल केंद्र शासनाचे वकील असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी गुरुवारी (दि.२८) खंडपीठात सादर केला. यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ६ तालुके आणि नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्यामधील एकूण १८२ गावांमधील ८६,१०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.

निळवंडे प्रकल्पासाठी २२३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीस केंद्र शासनाची परवानगी
औरंगाबाद : निळवंडे प्रकल्पासाठी २२३२ कोटी ६२ लाख रुपयांच्या गुंतवणुकीस केंद्र शासनाच्या गुंतवणूक मान्यता समितीने परवानगी दिली आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करावयाचा आहे, असे २५ फेब्रुवारी २०१९ चे पत्र आणि बैठकीचा कार्य अहवाल केंद्र शासनाचे वकील असिस्टंट सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी गुरुवारी (दि.२८) खंडपीठात सादर केला. यामुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ६ तालुके आणि नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्यामधील एकूण १८२ गावांमधील ८६,१०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल.
न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठात सुनावणी झाली. याचिकेची पुढील सुनावणी ७ मार्च रोजी होणार आहे.
वरील अहवालात राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार निळवंडे प्रकल्पाची साठवणक्षमता २३६ दलघमी आहे. त्यातील २३२.१८ दलघमी जिवंत साठा असून, पिण्याच्या पाण्यासाठी १३.१५ दलघमीची तरतूद आहे. या प्रकल्पातून ११.६० मेगावॅट वीजनिर्मिती होऊ शकेल.
या प्रकल्पावर राज्य शासनाने डिसेंबर २०१८ पर्यंत ९७४.३२ कोटी रुपये खर्च केला आहे. डावा कालवा ८५ कि.मी. असून, उजवा कालवा ९७ कि.मी.आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करावयाचा असला तरी मुख्य धरण तयार असल्यामुळे ३ ते ४ वर्षांतच प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित आहे.
आज राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे, गोदावरी महामंडळातर्फे अॅड. बाबूराव आर. सुरवसे, शिर्डी संस्थानतर्फे अॅड. नितीन भवर, हस्तक्षेपकातर्फे अॅड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांनी काम पाहिले.
--------------