जगातील बाराशे लेण्यांपैकी हजारांवर लेण्या एकट्या भारतात
By Admin | Updated: September 16, 2014 01:36 IST2014-09-16T01:14:36+5:302014-09-16T01:36:16+5:30
औरंगाबाद : जगातील विविध देशांत असलेल्या लेणी संख्येत सर्वाधिक म्हणजे सुमारे बाराशेहून अधिक लेण्या केवळ भारतात असून, देशातील अनेक प्रांतांमध्ये असलेल्या

जगातील बाराशे लेण्यांपैकी हजारांवर लेण्या एकट्या भारतात
औरंगाबाद : जगातील विविध देशांत असलेल्या लेणी संख्येत सर्वाधिक म्हणजे सुमारे बाराशेहून अधिक लेण्या केवळ भारतात असून, देशातील अनेक प्रांतांमध्ये असलेल्या या लेण्यांतील हजारांहून अधिक लेण्या एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रातील बुद्धलेण्यांचा समूह अजिंठा येथे असून, तो आता जागतिक संस्कृतीचा वारसा म्हणून मान्यता पावला आहे, असे प्रतिपादन अभ्यासक प्रा. डॉ. डी. पी. जगताप यांनी केले.
प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ व ‘संवेदन विवाह समुपदेशन केंद्र’ यांच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानात प्रा. डॉ. पी. डी. जगताप बोलत होते. यशवंत कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तांबटकर, चित्रकार गढरी, उद्योजक अर्जुन गायके, विजय खाचणे, सूर्यकांत सराफ, डॉ. विश्वनाथ उतकर, डॉ. डी. एस. कोरे, चंद्रकांत शिराळकर, राम जाधव, शकुंतला कोरे, गीता ढमाले, पुष्पा जगताप यावेळी उपस्थित होते.
डॉ. जगताप म्हणाले, स्थापत्य, शिल्प व चित्र ही लेण्यांची प्रमुख वैशिष्ट्ये असतात. मात्र, अजिंठा लेण्याला याशिवाय निसर्गसंपन्नतेचाही वारसा लाभला आहे. अजिंठा लेणी हे एक प्रतिविश्वच आहे.
अजिंठा लेण्यांच्या परिसरातील निसर्ग चित्रांच्या दृकश्राव्य अनुभूतींसह त्यांनी शिल्पांचे प्रत्यक्ष दर्शनही विविध बारकाव्यांसह घडवले. समाजजीवनातील विविध वैशिष्ट्ये, तत्कालीन स्त्रियांच्या केशरचना, वेशभूषा, अलंकार व सौंंदर्य-प्रसाधनांसह पशुपक्ष्यांचीही माहिती त्यांनी दिली. अलीकडच्या काळात जर्मन अभ्यासक डॉ. सिंग्लाफ यांनी प्रदर्शित केलेल्या गायींच्या कळपांच्या विविध गुणवैशिष्ट्यांसह पर्शियन राजा-राणी, सेवक यांचीही माहिती त्यांनी दिली.