स्मशानभूमीसाठी थेट ग्रामपंचायतसमोर सरण; संघर्षानंतर प्रशासन नमले, लगेच जागा-निधी मंजूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:05 IST2025-12-15T18:02:50+5:302025-12-15T18:05:07+5:30
एका तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थांचा चार तास संघर्ष; जागा अन् २० लाख रुपयांचा निधीही जागेवरच मंजूर.

स्मशानभूमीसाठी थेट ग्रामपंचायतसमोर सरण; संघर्षानंतर प्रशासन नमले, लगेच जागा-निधी मंजूर!
खुलताबाद: गावात सार्वजनिक स्मशानभूमी (दफनभूमी) नसल्याने खांडीपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला जागेवरच आव्हान देत एक अभूतपूर्व आंदोलन केले. अपघातात मृत्यू झालेल्या एका तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाकडे आणून सरण रचल्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले आणि तातडीने स्मशानभूमीसाठी २० गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली.
तालुक्यातील खांडीपिंपळगाव येथील २३ वर्षीय तरुण विशाल रोहीदास वाकचौरे याचा रविवारी रात्री वाळूज एमआयडीसी परिसरात अपघाती मृत्यू झाला. सोमवारी दुपारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे होते. नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी शेत परिसरात तयारी केली. मात्र, परिसरातील काही लोकांनी त्याला विरोध करत जागेवरून वाद घातला. गावात कुठेच सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने, संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक अभूतपूर्व पाऊल उचलले. त्यांनी थेट खांडीपिंपळगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाकडे आणून अंत्यसंस्कारासाठी सरण रचले.
ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये चार तास चर्चा
या घटनेची माहिती मिळताच खुलताबाद तालुका प्रशासनात मोठी खळबळ उडाली. नायब तहसीलदार सुभाष पांढरे आणि पोलीस निरीक्षक धनंजय फराटे मोठा फौजफाटा घेऊन गावात दाखल झाले. संतप्त ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये तब्बल तीन ते चार तास प्रदीर्घ चर्चा झाली. ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली.
प्रशासनाने घेतली माघार, जागेसह निधीही मंजूर
अखेर ग्रामस्थांच्या मागणीसमोर प्रशासनाला झुकावे लागले. तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी तातडीने कार्यवाही करत खांडीपिंपळगावात गटनंबर १९४ मध्ये सार्वजनिक स्मशानभूमीसाठी २० गुंठे गायरान जागा उपलब्ध करून दिल्याची घोषणा केली. केवळ जागाच नव्हे, तर गटविकास अधिकारी प्रकाश नाईक यांनी लगेचच जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीसाठी १० लाख आणि सुशोभीकरणासाठी १० लाख असे एकूण २० लाख रुपये मंजूर असल्याची माहिती दिली. जागा निश्चित झाल्यानंतर आणि तातडीने साफसफाई केल्यानंतर अखेर दुपारी साडेतीन वाजता तरुणाच्या पार्थिवावर नवीन स्मशानभूमीच्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले.