अचानक आग लागल्याने कंटेनर भरून मुरमुरा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 15:48 IST2021-10-13T15:48:03+5:302021-10-13T15:48:53+5:30
सुदैवाने चालक वेळीच बाहेर पडल्याने जीवितहानी टळली

अचानक आग लागल्याने कंटेनर भरून मुरमुरा जळून खाक
आडूळ ( बीड ) : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पैठण तालुक्यातील आडगाव जावळे शिवारात मुरमुरे घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याची घटना आज पहाटे १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याविषयी माहिती अशी की, औरंगाबादहून मुरमुरा माल घेऊन एक कंटेनर ( एन एल ०२ क्यू ३४८३ ) बीडकडे सोमवारी रात्री निघाला. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडगाव जावळे शिवारात पहाटे १ वाजेच्या सुमारास धावत्या कंटेनरने पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून रस्त्याच्या कडेला कंटेनर उभा करून आपला जीव वाचवल्याने मोठा अनर्थ टळला.
कंटेनरला आग लागल्याची माहिती गावकऱ्यांनी लागलीच पाचोड पोलिसांना दिली. यानंतर औरंगाबादेतील महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने येऊन परिश्रमानंतर आग विझवले. आगीत कंटेनरमधील संपूर्ण मुरमुरा माल जळून खाक झाला. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष चव्हाण करीत आहेत.