कॅरीबॅग बंदीचा फियास्को !

By Admin | Updated: August 26, 2014 00:17 IST2014-08-26T00:17:26+5:302014-08-26T00:17:26+5:30

आशपाक पठाण , लातूर लातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात ४० मायक्रॉनपेक्षा कमीच्या कॅरीबॅगच्या वापरास महापालिकेने वर्षभरापूर्वी बंदी आणली़ शहर कॅरीबॅगमुक्त करून स्वच्छ शहर,

Caribag ban Fiasco! | कॅरीबॅग बंदीचा फियास्को !

कॅरीबॅग बंदीचा फियास्को !



आशपाक पठाण , लातूर
लातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात ४० मायक्रॉनपेक्षा कमीच्या कॅरीबॅगच्या वापरास महापालिकेने वर्षभरापूर्वी बंदी आणली़ शहर कॅरीबॅगमुक्त करून स्वच्छ शहर, सुंदर शहर करण्याचा संकल्प केलेल्या मनपा प्रशासनाच्या मोहिमेला व्यावसायिकांनी अडथळा घातला आहे़ लातूर शहरात कॅरीबॅग बंदी असली तरी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात कॅरीबॅगचा वापर वाढला आहे़ याप्रकरणी ‘लोकमत’ने सोमवारी स्टींग केले असता बाजारात सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर सुरू असल्याचे दिसून आले़
गणरायाच्या आगमनाला कॅरीबॅगमुक्त शहराचा संकल्प करणाऱ्या मनपाच्या मोहिमेची गतवर्षी गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली़ काही उत्साही सामाजिक संस्था, संघटना तसेच व्यावसायिकांनी कॅरीबॅग बंद करून कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्यासाठी ‘उद्घाटन’ करून फोटो काढून प्रसिध्दीसाठी पिशव्या तयार केल्या़ महिनाभराची मोहिम थंडावताच त्याच व्यावसायिकांनी पुन्हा कॅरीबॅगचा वापर सुरू केला आहे़
लातूर शहराची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईतील बहुतांश फळविक्रेते, भाजीविक्रेते, किराणा दुकान, मटन मार्केट आदी ठिकाणी बंदी असलेल्या कमी मायक्रॉनच्या कॅरीबॅग वापरात आल्या आहेत़ बंदीच्या नावाखाली कॅरीबॅग विक्रेत्यांची मात्र चांदी सुरू आहे़ १० रूपयांना मिळणारे कॅरीबॅगचे पॉकेट आता २० ते २५ रूपयांना मिळते़ किरकोळ व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेते, फळविक्रेत्यांना कॅरीबॅग पुरविणारी यंत्रणा बंदीनंतर कार्यरत झाली आहे़
ग्राहकांकडूनच होतो हट्ट़़़
सोमवारी दयानंद गेट परिसरातील भाजीपाला बाजारात पाहणी केली असता बहुतांश भाजीविक्रेत्यांकडे कॅरीबॅग आढळून आल्या़ कॅरीबॅग असेल तर भाजी घेणार असा हट्ट ग्राहकांकडूनच होत असल्याने परवडत नसले तरी कॅरीबॅग ठेवावी लागते, असे ग्रामीण भागातून आलेल्या एका भाजीविक्रेत्या महिलेने सांगितले़ कॅरीबॅग देतो कोण, असे म्हटल्यावर दोघे-तिघे आहेत बाजारात़ त्यांच्याकडून महागात कॅरीबॅगचा पुडा विकत घ्यावा लागतो़ बरेच ग्राहक पिशवीसाठी वाद घालतात़ अगोदरच ग्राहक कमी़ त्यात पुन्हा कॅरीबॅग नाही म्हणून ग्राहक परत पाठविणे हे नुकसानीचे असल्याने कधी तरी कॅरीबॅग उपलब्ध करून द्यावी, लागते असे विक्रेत्यांनी सांगितले़
प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर वाढल्याने लातुरात विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहे़ छुप्या पध्दतीने विक्री जोरात आहे़ मनपाचे पथक प्रमुख विक्रेत्यांवर कारवाई करीत नसल्याची ओरड होत आहे़

लातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात वर्षभरापूर्वी मनपा प्रशासनाने कॅरीबॅगबंदीचा निर्णय घेतला़ यावर सामाजिक संघटना, शाळा, महाविद्यालय, महिला बचत गट आदींना मोहिमेत सहभागी करून घेत जनजागृती केली़ महिनाभर झालेली जनजागृती थंडावताच पुन्हा कॅरीबॅॅगने डोकेवर काढले़
४४० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅग बाजारात मिळतात़ लातुरात बंदी असल्याच्या नावाखाली विक्रेत्यांकडून दुप्पट ते तिप्पट दराने कॅरीबॅगचे पॉकेट विकले जात आहे़ मनपा प्रशासनाचे अधिकारी-कर्मचारी छापे टाकून किरकोळ फळविक्रेते, भाजीविक्रेते यांच्याकडून कॅरीबॅग जमा करून मोठ्या कारवाया केल्याचा कांगावा करतात़ मूळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे़
४शहराच्या गंजगोलाई, दयानंद गेटवरील रयतू बाजार, राजीव गांधी चौक, अंबाजोगाई रोडवरील जुना रेणापूर नाका आदी ठिकाणी सोमवारी पाहणी केली असता बहुतांश व्यावसायिकांकडे कॅरीबॅग दिसून आल्या़

Web Title: Caribag ban Fiasco!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.