वाळूजमध्ये भरधाव कारच्या धडकेत पादचारी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 20:22 IST2018-11-04T20:22:27+5:302018-11-04T20:22:51+5:30
वाळूज महानगर : औरंगाबादहून नगरकडे जाणाऱ्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला, तर कारमधील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गरवारे कंपनीजवळ घडली. हरीश संजय वाघ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

वाळूजमध्ये भरधाव कारच्या धडकेत पादचारी ठार
वाळूज महानगर : औरंगाबादहून नगरकडे जाणाऱ्या भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाला, तर कारमधील महिला गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास गरवारे कंपनीजवळ घडली. हरीश संजय वाघ असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हरीश वाघ (रा. त्रिमूर्ती चौक जवाहर कॉलनी, औरंगाबाद) व चालक कारभारी पवार (रा. पडेगाव) हे रविवारी सकाळी औरंगाबाद येथून आयशर टेम्पोत (एमएच -२०, डीई०३३७) टरबूज घेऊन नगरच्या दिशेने निघाले. वाघ यांचे चुलत मेव्हणे विजय अहिरे (रा. लाईननगर, वाळूज) यांचे महामार्गावर गरवारे कंपनीजवळ गॅरेज आहे. त्यामुळे वाघ यांनी मेव्हण्याला भेटण्यासाठी रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा केला. वाघ, मेव्हणा अहिरे व चालक पवार हे बाजूच्या टपरीवर चहा घेऊन टेम्पोकडे पायी जात होते.
त्याचवेळी औरंगाबादहून पुण्याला जाणाºया भरधाव कारने (एमएच - १४, डीटी - ५५०६) वाघ यांना धडक देत टेम्पोपर्यंत फरपटत नेले. त्यानंतर कार टेम्पोवर जाऊन आदळली. या विचित्र अपघातात वाघ गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध पडले. कारमधील महिला अपर्णा गुरुनाथ आपटे (४९) या गंभीर जखमी झाल्या. कारचालक गुरुनाथ आपटे (५५) किरकोळ जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार रवीकुमार पवार यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन विजय अहिरे, कारभारी पवार, कडूबा बकवाल यांच्या मदतीने वाघ व अपर्णा यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. वाघ यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले, तर अपर्णा यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात विजय अहिरे यांच्या फिर्यादीवरून कारचालक गुरुनाथ आपटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.