छोट्या नव्हे, मोठ्या शहरांत कॅन्सरचा धोका अधिक; ही घ्या काळजी...
By संतोष हिरेमठ | Updated: February 4, 2025 11:25 IST2025-02-04T11:24:37+5:302025-02-04T11:25:13+5:30
जागतिक कर्करोग दिन विशेष: मुंबई सर्वाधिक चिंतादायक, छत्रपती संभाजीनगरातही वाढतेय प्रमाण

छोट्या नव्हे, मोठ्या शहरांत कॅन्सरचा धोका अधिक; ही घ्या काळजी...
छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर म्हटला की धडकी भरते. पण अत्याधुनिक उपचारांमुळे कर्करोगावर यशस्वीपणे उपचार घेणे शक्य आहे. कॅन्सरची लागण वाढत आहे. एका अहवालातून छोट्या शहरांच्या तुलनेत मोठ्या शहरांमध्ये कॅन्सरचा धोका अधिक असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत सर्वाधिक चिंतादायक स्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरातही कॅन्सरचा धोका वाढत आहे.
दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन पाळला जातो. यानिमित्त विविध माध्यमातून कॅन्सरविषयी जनजागृती केली जाते. राष्ट्रीय लोकसंख्या आधारित कॅन्सर रजिस्ट्री कार्यक्रमाद्वारे राज्यातील माहिती संकलित करण्यात येते. यातून जाहीर केलेल्या एका अहवालात राज्यातील वेगवेगळ्या शहरांत ७४ वर्षांपर्यंतच्या व्यक्तींना कर्करोग होण्याच्या धोक्यासंदर्भात प्रमाण नमूद आहे.
ही घ्या काळजी...
- तंबाखू व धूम्रपान टाळणे.
- नियमित आरोग्य तपासणी.
- संतुलित आहार व योग्य व्यायाम.
- ताणतणाव कमी.
- प्रदूषण नियंत्रणावर भर.
कुठे किती कर्करोगाचा धोका?
शहर/जिल्हा - पुरुषांना कर्करोगाचा धोका - महिलांना कर्करोगाचा धोका -
मुंबई - ९ पैकी १ - ८ पैकी १
नागपूर - १० पैकी १ - ११ पैकी १
पुणे - ११ पैकी १ - १० पैकी १
छत्रपती संभाजीनगर - १३ पैकी १ - १२ पैकी १
वर्धा जिल्हा - १४ पैकी १ - १४ पैकी १
बार्शी ग्रामीण - १७ पैकी १ - १५ पैकी १
बीड-धाराशिव - २३ पैकी १ - १९ पैकी १
अतिप्रक्रियायुक्त अन्नपदार्थ टाळा
तंबाखूचा वापर आणि मद्यसेवन टाळण्याव्यतिरिक्त, अतिप्रक्रियायुक्त अन्न, स्थूलता आणि सूक्ष्म प्लास्टिक, कीटकनाशके व रसायनांनी दूषित होऊ शकणारे अन्न टाळावे. स्थूलत्व आणि अतिप्रक्रियायुक्त अन्नाचे दुष्परिणाम होतात.
- डाॅ. अनुप तोष्णीवाल, कॅन्सरतज्ज्ञ
निदान सोपे
सोनोग्राफी आणि सीटी स्कॅनमुळे कर्करोगाचे लवकर निदान होते. सोनोग्राफीमुळे स्तनातील गाठींचे स्वरूप आणि त्यांचा प्रकार ओळखणे सोपे जाते.
- डॉ. राहुल रोजेकर, रेडिओलॉजिस्ट
जोखमीचे घटक
तंबाखूचे सेवन, मद्यपान आणि लठ्ठपणा हे कॅन्सरवाढीमागे जोखमीचे घटक आहेत. त्याबरोबरच वाढते हवेचे प्रदूषण, भाज्या, फळांचे कमी सेवन हेही कारणीभूत ठरतेय.
- डॉ. अर्चना राठोड, स्त्री कर्करोग विभाग प्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय
मात शक्य
प्रत्येक रुग्ण हा वेगळा असतो. रुग्णाच्या स्थितीनुसार उपचारांवर भर द्यावा लागतो. कॅन्सरमधून बाहेर पडू, हा विश्वास रुग्णांनी ठेवला पाहिजे. उपचार घेऊन कॅन्सरवर मात करता येते.
- डाॅ. वरुण नागोरी, कॅन्सरतज्ज्ञ
मी हरले नाही
केमोथेरपीमुळे मी माझे केस गमावले, पण जिद्द गमावली नाही. मी ठरवले की, या आजाराला हरवायचेच. आता ठणठणीत आहे. इतर रुग्णांना मानसिक आधार देते.
- एक कॅन्सरग्रस्त