जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 13:47 IST2025-06-06T13:46:05+5:302025-06-06T13:47:05+5:30

शेंद्रा एमआयडीसीत ‘केनिया डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला जागा, कंपनी शिरसाट यांच्या मुलाची असल्याचा दावा

Cancelling truck terminal reservation to make way for son's liquor industry; Imtiaz Jaleel's direct accusations against Sanjay Shirsat | जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप

जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप

छत्रपती संभाजीनगर: सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याभोवती वादांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. हॉटेल वेदांत लिलाव वादाच्या सावलीतून ते अजून सावरत नाहीत, तोवर आता माजी खासदार व एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

शेंद्रा एमआयडीसी परिसरात ‘केनिया डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीला तब्बल २१ हजार चौरस फूट जागा देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही कंपनी पालकमंत्र्यांचे सुपुत्र यांच्या मालकीची असल्याचा दावा जलील यांनी केला आहे. या भूखंडासाठी पूर्वी ट्रक टर्मिनलचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, ते आरक्षण हटवून ही जागा मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीला दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

“फूड प्रॉडक्ट निर्मितीच्या नावाखाली असलेल्या कंपनीला प्रत्यक्षात अल्कोहोल युनिट सुरू करण्यासाठी जागा देण्यात आल्याचा हा प्रकार गंभीर असून, यामागे शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचा संशय नाकारता येणार नाही,” अशी घणाघाती टीका जलील यांनी केली. “शासनाने या प्रकरणात पारदर्शकता दाखवून दोषींवर करावी” अशी मागणी जलील यांनी पत्रकार परिषदेतून केली. दरम्यान, ‘हॉटेल वेदांत’च्या लिलावातील कथित गैरव्यवहार प्रकरणातही शिरसाट अडचणीत सापडलेले असतानाच, हा नवा वाद त्यांच्या अडचणीत भर घालणारा ठरू शकतो.

काय होता हॉटेल वेदांत व्यवहार वाद?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांच्यावर आरोप करताना, हॉटेल वेदांतची रेडीरेकनरप्रमाणे किंमत सुमारे ११० कोटी रुपये, मात्र बाजारभावाच्या तुलनेत खूपच कमी किमतीत म्हणजे ६७ कोटींना मिळाल्याचा दावा केला. यावर मंत्री शिरसाट यांनी "लिलावात उतरण्याआधी काही रक्कम भरावी लागते, मग २५ टक्के रक्कम भरावी लागते. त्यानतंर कोर्टात उर्वरित ७५ टक्के रक्कम भरावी लागते. आता ६७ कोटी ही किंमत कोर्टाने ठरवलेली आहे. पण पुढे प्रक्रिया काहीही झालेली नाही. जो व्यवहार पूर्ण झालेला नाही, त्यावरून टीका सुरू झाली. माझ्यावर जे आरोप झालेत त्यामुळे मी माझ्या मुलाला या लिलाव प्रक्रियेतून बाहेर पडण्यास सांगणार आहे", असंही संजय शिरसाट यांनी जाहीर केले आहे.

Web Title: Cancelling truck terminal reservation to make way for son's liquor industry; Imtiaz Jaleel's direct accusations against Sanjay Shirsat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.