विमान रद्द; प्रवासी संतप्त
By Admin | Updated: December 17, 2014 00:39 IST2014-12-17T00:36:50+5:302014-12-17T00:39:15+5:30
औरंगाबाद : बहुतांश प्रवासी ४ वाजता विमानतळावर पोहोचले; पण तिथे गेल्यावर दिल्लीचे विमान रद्द झाल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर प्रवाशांचा राग अनावर झाला.

विमान रद्द; प्रवासी संतप्त
औरंगाबाद : बहुतांश प्रवासी ४ वाजता विमानतळावर पोहोचले; पण तिथे गेल्यावर दिल्लीचे विमान रद्द झाल्याचे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यावर प्रवाशांचा राग अनावर झाला. त्यामुळे विमान कंपनीचे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वादावादी सुरू झाली. याचवेळी एक कर्मचारी प्रवाशांशी उद्धट बोलला. यामुळे सर्व प्रवासी संतापले.
संभ्रमाची स्थिती
सायंकाळचे ५.३० वाजेचे विमान रद्द झाले याची तोंडी माहिती मिळत होती. मात्र, कंपनीने कोणताच मेसेज पाठविला नाही. कर्मचारीसुद्धा कोणतीही ठोस माहिती प्रवाशांना देत नव्हते. यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या विमानाने पाठविणार का, तिकिटाची पूर्ण रक्कम परत देणार का किंवा आणखी कोणती व्यवस्था करणार, असे अनेक प्रश्न प्रवासी विचारत होते; पण कर्मचाऱ्यांकडे कोणतेच उत्तर नव्हते.
दोन महिन्यांपूर्वी केली बुकिंग
दिल्लीचा रहिवासी युवराज नरुला याने सांगितले की, स्पाईस जेटने एक ते दोन महिन्यांपूर्वी विशेष योजना जाहीर केली. त्याअंतर्गत मी औरंगाबादचे येण्या-जाण्याचे तिकीट काढले होते. औरंगाबादमधील पर्यटनस्थळे पाहून व शिर्डीतील साईबाबांचे दर्शन घेऊन मी आज दुपारच्या विमानाने दिल्लीला जाणार होतो. मात्र, अचानक विमान रद्द झाल्याने मी उद्या आॅफिसला वेळेवर पोहोचू शकणार नाही. विजयकुमार बन्सल म्हणाले की, जालना येथे लग्नासाठी आलो होतो. दीड महिन्यापूर्वी तिकीट बुक केले होते. आज विमानतळावर येईपर्यंत आम्हाला विमान रद्द झाल्याचे कंपनीने कळविले नव्हते. कर्मचारीही उद्धटासारखे बोलत आहेत. जळगावचे मनोज पाटील म्हणाले की, बुधवारी दिल्ली येथे बिझनेस मीटिंग आहे. त्यासाठी आज मला तेथे पोहोचणे आवश्यक होते. आता ३५ हजार रुपये खर्च करून दुसऱ्या विमानाने जाण्याशिवाय पर्याय नाही. विमान कंपन्यांनी प्रवाशांचा छळ मांडला असल्याचा आरोप त्यांनी केला. हिरेश गुप्ता या विद्यार्थ्याला शिमला येथे बुधवारी सरकारच्या वतीने स्कॉलरशिप प्राईज मिळणार होते. मात्र, त्याला वेळेवर पोहोचता येणार नसल्याने त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. एका प्रवाशाचे दिल्लीहून मध्यरात्री ३ वाजता न्यूर्याकचे विमान होते. त्याला न्यूयार्कचे तिकीट रद्द करावे लागले.