कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणुक; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक गुजरातमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 19:42 IST2025-11-03T19:41:59+5:302025-11-03T19:42:22+5:30
मास्टरमाईंड आरोपीला घेतले सोबत

कॉल सेंटरद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणुक; आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक गुजरातमध्ये
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीतून अमेरिकन नागरिकांना फसविणाऱ्या कॉल सेंटरचा राजवीर प्रदीप शर्मा हाच मास्टरमाईंड असल्याचे चाैकशीतून समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी त्यास सोबत घेत गुजरातमधील अहमदाबाद येथील त्याच्या घराची झाडाझडती घेतली. त्यात अनेक महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत. राजवीरचा काका बलवीर वर्मा ऊर्फ पाजी याचा शोध गुजरातमध्ये घेतला जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार अमेरिकन लोकांची फसवणूक करण्यासाठी राजवीरचा काका बलवीर वर्मा ऊर्फ पाजी यानेच सिंडिकेट तयार केले होते. त्याला जॉन नावाच्या व्यक्तीने ही कल्पना दिली. त्यासाठी वर्माने त्याचा पुतण्या राजवीरला या कामात सोबत घेतले. छत्रपती संभाजीनगर येथील फारुकीशी संपर्क होताच तोही सिंडिकेटमध्ये सहभागी झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. ४५ टक्के जॉनचे, तर ५५ टक्के वर्मा अशी वाटणी व्हायची. राजवीरच्या रूमची झडती घेताना पोलिसांना त्याच्या लॅपटॉपमध्ये अमेरिकन प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र, न्यायालयीन आदेशांची बनावट कागदपत्रे तसेच अमेरिकन पीडित नागरिकांची नावे व डेटा सापडला. बलवीरने २५ ते ३० कोटी रुपयांची गुंतवणूक करून कॉल सेंटर उभारले. बलवीर-राजवीरचे नातेवाईक मोहाली, अहमदाबाद, मुंबई तसेच परदेशात वास्तव्यास असून, या सिंडिकेटला त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडूनच साहाय्य मिळत असल्याची माहिती फारुकीच्या चौकशीत उघड केली होती. रॅकेटमधील प्रमुख आरोपी फारुकी, मनवर्धन राठोड, सतीश लाडे यांची डीसीपी प्रशांत स्वामी, पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी रविवारी देखील एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात चार तासांहून अधिक काळ चौकशी केली.
जप्त साहित्य फॉरेन्सिक लॅबकडे
बोगस कॉल सेंटरमधून जप्त केलेले लॅपटॉप, मोबाईल हे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज (एफएसएल) येथे तपासणीसाठी पाठवले आहे. त्यातील आरोपींनी केलेले कॉल, बँकांचे ट्रान्जेक्शन, डिजिटल डेटा तपासला जात आहे; मात्र त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. हा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गीता बागवडे, एपीआय मोहसीन सय्यद, अमोल म्हस्के, पीएसआय उत्तरेश्वर मुंडे, छाया लांडगे, लालखान पठाण यांचे पथक तपास करत आहे.