शेतकरी वाहून जात असताना ‘ते’ व्हिडीओ करण्यात व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 04:50 AM2019-09-19T04:50:49+5:302019-09-19T11:32:00+5:30

बुधवारी झालेल्या पावसात तालुक्यात माणुसकीही वाहून गेल्याचा अनुभव आला.

Busy doing 'that' video while the farmers are carrying | शेतकरी वाहून जात असताना ‘ते’ व्हिडीओ करण्यात व्यस्त

शेतकरी वाहून जात असताना ‘ते’ व्हिडीओ करण्यात व्यस्त

googlenewsNext
ठळक मुद्देसिल्लोड तालुक्यात माणुसकी गेली वाहून 

- श्यामकुमार पुरे  

सिल्लोड (जि. औरंगाबाद) : बुधवारी झालेल्या पावसात तालुक्यात माणुसकीही वाहून गेल्याचा अनुभव आला. सावखेड्याजवळ   पूर्णानदीला आलेल्या पुरात पंडित पांडू गोंगे (३०, रा. सावखेडा) हा  शेतकरी वाहून जात असताना काही हौशी लोकांनी त्याचा व्हिडिओ केला. त्यास पाण्यात जाण्यासाठी कोणी रोखले नाही वा वाचविण्याचा प्रयत्नही केला नाही.  या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सावखेडा गावात मेडिकल स्टोअर नसल्याने आईचे रक्तदाब आणि मधुमेहावरील औषध आणण्यासाठी तो सावखेडा येथून बोरगाव बाजार येथे पायी जात होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो रस्ता ओलांडत होता. तो चालत असताना दुरून काही हौशी लोकांनी त्याचा व्हिडिओ केला. पुढे थोड्या अंतरावर रस्त्यावरून तोल जाऊन हा शेतकरी पूर्णानदीच्या प्रवाहात वाहून गेला. तो  वाहून जाताना लोकांनी त्याला पाहिले; पण कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. यावेळी हे सर्वजण व्हिडिओ तयार करण्यात मग्न होते. हा शेतकरी वाहून जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ‘माणुसकी’ वाहून गेल्याचे हे दर्शन सर्वांना झाले.  या घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, फौजदार विकास आडे, कर्मचारी मुश्ताक शेख, दीपक इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली व त्याचा शोध घेतला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने व पुराचे पाणी वाढत असल्याने उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.  

दोन नद्यांचा संगम
सावखेडा गावातून पूर्णा नदी वाहत जाऊन या नदीला घाटनांद्र्याकडून येणारी चारणा नदी मिळते. दोन नद्यांचा येथे संगम होतो. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढतो. या दोन नद्यांच्या संगमात हा शेतकरी वाहून गेला. 

शेतकऱ्याचा शोध घेण्यासाठी गुरुवारी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाला बोलविण्यात येणार आहे. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यावर शोध घेतला जाईल. जोरदार पाऊस सुरू असल्याने रात्री शोध घेणे शक्य नाही. घटनास्थळी तलाठी अशोक निकाळजे, मंडळ अधिकारी जी. व्ही. दांडगे यांना पाठविण्यात आले आहे. गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेणे सुरूच आहे.
- रामेश्वर गोरे, तहसीलदार, सिल्लोड  

Web Title: Busy doing 'that' video while the farmers are carrying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.