व्यापाऱ्याच्या कुटुंबाला जमावाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:04 IST2021-06-28T04:04:06+5:302021-06-28T04:04:06+5:30
औरंगाबाद : पैशाच्या व्यवहारातून व्यापाऱ्याच्या कुटुंबाला दहा जणांच्या जमावाने मारहाण केली व चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ...

व्यापाऱ्याच्या कुटुंबाला जमावाकडून मारहाण
औरंगाबाद : पैशाच्या व्यवहारातून व्यापाऱ्याच्या कुटुंबाला दहा जणांच्या जमावाने मारहाण केली व चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना २६ जून रोजी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास गारखेडा परिसरातील रेणुकानगरात घडली.
मारहाणीत प्रकाश रामधन राठोड (४४, रा. रेणुकानगर, गारखेडा) हे जखमी झाले असून याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश राठोड हे देवळाई चौकातून घरी जात होते. तेव्हा संदीप राठोड याने त्यांना हप्त्याच्या पैशाची मागणी केली. त्यातून दोघांमध्ये देवळाई चौकातील वाळूच्या ठेल्यावर वाद झाला. त्यानंतर प्रकाश राठोड हे घरी निघून गेले. त्यानंतर रात्री पत्नी, मुलीसह घरात टीव्ही पाहत असताना संदीप राठोड, मारुती राठोड व इतर सात ते आठ जण प्रकाश यांच्या घरी गेले. त्यांना आवाज देऊन घराबाहेर बोलाविल्यानंतर संदीपने प्रकाश यांच्या शर्टाची कॉलर धरून त्यांना ओढत गल्लीतील रस्त्यावर आणले. त्यानंतर दांडा आणि बेल्टने दहा जणांच्या टोळक्याने प्रकाश यांना मारहाणीला सुरुवात केली. प्रकाश यांचा आवाज ऐकून त्यांची पत्नी आणि मुलगी घराबाहेर धावत आली. त्यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जमावाने त्यांच्या पत्नी आणि मुलीला देखील मारहाण केली. घडलेल्या या घटनेप्रकरणी प्रकाश यांनी पोलिसांत तक्रार दिली असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे करत आहेत.