दौलताबाद : धुळे-सोलापूर महामार्गावरील करोडी टोल नाक्याजवळील पुलाखाली उद्योजक सागर रामभाऊ परळकर (वय ३७) यांचा मृतदेह आढळला. सोमवारी दुपारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली.
रविवारी रात्री कामानिमित्त ते दुचाकीने कन्नडला गेले होते. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यामुळे सागर यांचा मृत्यूअपघाताने झाला की घातपाताने, याचा दौलताबाद पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोमवारी सायंकाळी करोडी टोल नाक्याजवळील पुलाखाली वाहनचालकांना मृतदेह दिसला. माहिती कळताच दौलताबादच्या पोलिस निरीक्षक रेखा लोंढे, उपनिरीक्षक अयुब पठाण यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळील मोबाइल व आधार कार्डवरून सागर यांची ओळख पटली. तेथेच त्यांची दुचाकी तुटलेली सापडली. त्यांच्या कुटुंबाला कळवून मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत पाठवण्यात आला.
वाळूजमध्ये ॲग्रो कंपनीचे संचालकमूळ पैठणचे असलेले सागर कुटुंबासह कांचनवाडीत वास्तव्यास होते. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांची भागीदारीत पुष्पक ॲग्रो कंपनी असून ते संचालक होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. रविवारी दुपारी ते कंपनीच्या कामासाठी दुचाकीने कन्नडला गेले होते. रात्री ९ वाजता त्यांचा पत्नीसोबत शेवटचा संपर्क झाला. त्यावेळी त्यांनी ‘मी हतनूरजवळ आहे. तासाभरात येतो’, असे सांगितले. मात्र, त्यानंतर कुटुंबाचा त्यांच्याशी संपर्कच झाला नाही. मध्यरात्रीतून हवालदिल झालेल्या सागर यांच्या कुटुंबीयांनी, मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला. सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह आढळला.
डोक्याला मार, घटनास्थळी ट्रकची नंबरप्लेटपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर यांच्या मृतदेहापासून काही अंतरावर एका ट्रकची नंबर प्लेट गाडी (टीएस -१५ -यूई ६९३४) आढळून आली. क्रमांकावरून पोलिसांनी ट्रकमालकाशी संपर्क साधून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. सागर यांच्या डोक्यावर मागून जखम आहे. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे निरीक्षक रेखा लोंढे यांनी सांगितले.