ब्रेक फेल झाल्याने बस उलटली; चालक-वाहकासह सहा प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 19:45 IST2021-04-03T19:45:28+5:302021-04-03T19:45:53+5:30
या दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनास वाचविताना चालकाने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात वळविली.

ब्रेक फेल झाल्याने बस उलटली; चालक-वाहकासह सहा प्रवासी जखमी
पैठण : जालना येथून सहा प्रवाशांना घेऊन निघालेली पाथर्डी आगाराची एसटी शनिवारी दुपारी पैठण - पाचोड रोडवर सोलनापूर - रहाटगाव शिवारात उलटली. या अपघातात बस चालक व महिला वाहकासह सहा प्रवाशी असे आठ जण जखमी झाले असून पैठण येथील शासकीय रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
जालना येथून प्रवासी घेऊन पाथर्डी आगाराची बस ( एमएच - 40 - एन - 8769 ) पैठणकडे भरधाव वेगात येत होती. सोलनापूर - रहाटगाव परिसरात सदर बसचे ब्रेक फेल झाले. या दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनास वाचविताना चालकाने बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात वळविली. वेग जास्त असल्याने बस उलटली व खड्ड्यात पडली. या अपघातात बसची पाठी मागील चाके निखळून लांब फेकली गेली. अपघाताची खबर मिळताच रविंद्र गिरी,रोहन अंबिलवादे,चैतन्य एरंडे , सरपंच अशोक फासाटे, शेखर शिंदे, शेख हसन शेख महेबूब,पैठण आगाराचे कर्मचारी मिथुन गायकवाड, वैशाली राऊत, जितेंद्र नाईक यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलविले.
अपघातात बस चालक शिवाजी दिनकर शिरसाठ (५३), महिला वाहक राधाबाई दामोदर आबूज (३८) ता. पाथर्डी यांच्यासह प्रवासी पांडुरंग शिवाजी गोजे, महादेव ढाकणे रा. पाथर्डी हे गंभीर जखमी झाले असून अन्य चार प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. जखमी बस चालक व वाहकास पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.