बैलगाड्या धूळ खात !
By Admin | Updated: May 11, 2015 00:32 IST2015-05-11T00:22:57+5:302015-05-11T00:32:52+5:30
सितम सोनवणे , लातूर केंद्र शासनाच्या वतीने मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी शेती औजारे देण्यासाठी विशेष घटक योजना राबविण्यात येते़ १० टक्के लोकवाटा भरल्यास बैलगाडी देण्याची योजना आहे़

बैलगाड्या धूळ खात !
सितम सोनवणे , लातूर
केंद्र शासनाच्या वतीने मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी शेती औजारे देण्यासाठी विशेष घटक योजना राबविण्यात येते़ १० टक्के लोकवाटा भरल्यास बैलगाडी देण्याची योजना आहे़ मात्र गतवर्षी १३ बैलगाड्या मंजूर होऊनही ५ लाभार्थ्यांकडे लोकवाटा भरण्यास पैसे नसल्यामुळे पंचायत समितीच्या आवारात या बैलगाड्या धूळखात पडून आहेत़ गेल्या सहा महिन्यांपासून बैलगाड्या पंचायत समितीच्या आवारातच वापराविना पडून आहेत़
केंद्र शासनाच्या वतीने अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी विशेष घटक योजना राबविण्यात येते़ या योजनेत गतवर्षी शेती १३ शेतकऱ्यांनी बैलगाड्यांची मागणी केली़ त्यानुसार पंचायत समितीने प्रस्तावही घेतले़ या प्रस्तावानुसार बैलगाड्या मंजूर झाल्या़ २० हजार ९०० रुपये एका बैलगाडीची किंमत आहे़ त्यात लाभार्थी शेतकऱ्याचा वाटा ५ हजार ९०० रुपयाचा आहे़ मंजूर झालेल्या १३ लाभार्थ्यांपैकी ५ लाभार्थी शेतकऱ्यांकडे ५ हजार ९०० रुपये लोकवाटा भरण्यास पैसे नाहीत़ त्यामुळे त्यांनी अद्याप बैलगाड्या ताब्यात घेतल्या नाहीत़ लाभार्थी शेतकऱ्यांनी येणाऱ्या खरीप हंगामातील पिकांवर लोकवाटा भरला जाईल, त्यापूर्वी आम्हाला बैलगाड्या द्याव्यात, अशी मागणी पंचायत समितीकडे केली़ मात्र लोकवाटा भरण्याची अट असल्यामुळे प्रशासनाने बैलगाड्या देण्यास नकार दिला आहे़ परिणामी, बैलगाड्या पंचायत समितीकडेच आहेत़
निवड झालेल्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना शेत विहीर, शेतीसाठी लागणारी वीज मोटार, तसेच शेतीसाठी उपयुक्त असे अन्य औजारांसाठी ही योजना आहे़ विहिरीसाठी एक लाखापर्यंतचे अनुदान देण्यात येते़ शेती औजारांसाठी ५० हजारापर्यंत अनुदान देण्यात येते़ या योजनेअंतर्गत २०१३-१४ या वर्षासाठी लाभार्थीं शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बैलगाडी योजना आखण्यात आली़ या योजनेत बैलगाडी घेण्यासठी खाजगी कंपनीकडून निविदा मागविण्यात आली होती़ या निविदेनुसार लोखंडी बैलगाडीची किंमत २० हजार ९०० रुपये ठरविण्यात आली़
१० टक्के लोकवाटा म्हणजे ५ हजार ९०० रूपये प्रत्येक लाभार्थ्यांना बंधनकारक होता़ त्यानुसार १३ पैकी ८ शेतकऱ्यांनी ५ हजार ९०० रुपयाचा लोकवाटा भरला़ त्यांना बैलगाड्या वितरीतही करण्यात आल्या़ मात्र पाच शेतकऱ्यांनी लोकवाटा भरला नाही़ त्यामुळे प्रशासनाने त्यांना बैलगाड्या दिल्या नाहीत़ गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाऊसकाळ कमी झाल्यामुळे शेती उत्पन्न घटले़ सध्या जिल्ह्यात दुष्काळ आहे़ त्यामुळे लोकवाटा भरुन बैलगाड्या ताब्यात घेणे शक्य नाही़ या हंगामात चांगला पाऊस झाला तर पीक येईल, त्यानंतर लोकवाटा भरुन बैलगाड्या घेऊत, असे वांगदरी येथील दोन्हीही लाभार्थी शेतकऱ्यांनी सांगितले़