८० फूट रुंद रस्त्यासाठी १५० घरांवर बुलडोझर; पण दीड किमी रस्त्याचे काम वर्षभरानंतरही अर्धवट

By मुजीब देवणीकर | Updated: February 17, 2025 18:43 IST2025-02-17T18:42:32+5:302025-02-17T18:43:50+5:30

मुकुंदवाडी स्टेशनसमोरील ८० फूट रुंद रस्त्याचे काम वर्षभरानंतरही अर्धवटच आहे.

Bulldozers on 150 houses for 80 feet wide road; but work on 1.5 km road incomplete even after a year | ८० फूट रुंद रस्त्यासाठी १५० घरांवर बुलडोझर; पण दीड किमी रस्त्याचे काम वर्षभरानंतरही अर्धवट

८० फूट रुंद रस्त्यासाठी १५० घरांवर बुलडोझर; पण दीड किमी रस्त्याचे काम वर्षभरानंतरही अर्धवट

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन भागात विश्वकर्मा चौक ते झेंडा चौकापर्यंत १५० पेक्षा अधिक घरांवर गतवर्षी २१ फेब्रुवारी रोजी मनपाने बुलडोझर चालविला होता. वर्ष होऊनही अद्याप या भागातील दीड किलोमीटर आणि ८० फूट रुंद रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही.

मुकुंदवाडी स्टेशनच्या गेटसमोरून ८० फूट रुंद रस्ता सिडकोने २००१ मध्ये प्रस्तावित केला. या रस्त्यावर ३० वर्षांपासून शेकडो नागरिक छोटी-मोठी घरे बांधून राहत होते. महापालिकेने पोलिस बंदोबस्तात २१ फेब्रुवारी रोजी या भागात कारवाई केली. वसाहतीमधील महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली. ७ पेक्षा अधिक पोलिस, मनपा कर्मचारी जखमी झाले होते. पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लाठीमार करावा लागला होता. विरोध मोडून मनपाने १५० घरे जमीनदोस्त केली होती. या घटनेला वर्ष होत आले. त्यानंतरही महापालिकेला ८० फूट रुंद आणि दीड किलोमीटरचा रस्ता करता आला नाही.

जालना रोडला पर्याय
जालना रोडवर १ फेब्रुवारी २०२४ रोजी गॅस टँकर उलटल्याने पर्यायी रस्त्यांचे महत्त्व प्रशासनाच्या लक्षात आले होते. प्रशासक जी. श्रीकांत यांनी जालना रोड, पायलट बाबानगरी मार्गे झेंडा चौक, विश्वकर्मा चौक, शिवाजीनगर हा मंजूर रस्ता तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाने हे शिवधनुष्य उचलले होते.

पंतप्रधान आवास योजनेचे आश्वासन
बेघर रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेत प्राधान्याने घरे देण्याचे आश्वासन मनपाकडून देण्यात आले होते. नंतर मनपाने रहिवाशांना ना कोणती विचारणा केली, ना प्रक्रिया पूर्ण केली.

प्लॉट विकणारे माफिया मोकळेच
विश्वकर्मा चौक ते झेंडा चौकापर्यंत डीपी रोडवर भूमाफियांनी अनधिकृत प्लॉट पाडून ते २५ हजार ते ३ लाखांपर्यंत नागरिकांना बॉन्ड पेपरवर विकले होते. बहुतांश बाँडवर दलालांच्या सह्या, फोटो आहेत. त्यानंतरही मनपा, पोलिसांनी माफियांवर कारवाई केली नाही.

अनेक तांत्रिक अडचणी
विश्वकर्मा चौक ते झेंडा चौकापर्यंत या रस्त्याचे काम १०० कोटींच्या योजनेतून करण्यात येत आहे. या कामासाठी अनेक तांत्रिक अडचणी होत्या. विजेचे खांब, ड्रेनेजलाइन हलवायची होती. ही कामे झाल्यावर अर्ध्याहून अधिक रस्ता झाला. उर्वरित दोन महिन्यांत पूर्ण होईल.
- ए. बी. देशमुख, शहर अभियंता.

Web Title: Bulldozers on 150 houses for 80 feet wide road; but work on 1.5 km road incomplete even after a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.