लाचखोर लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By Admin | Updated: July 14, 2015 00:50 IST2015-07-14T00:46:17+5:302015-07-14T00:50:40+5:30
जालना : सुधारित वेतन आयोगानुसार मंजूर झालेले वेतन पडताळणीचे काम करून सेवा पुस्तिकेत नोंद घेवून लेखाधिकाऱ्यांची सही

लाचखोर लेखापरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
जालना : सुधारित वेतन आयोगानुसार मंजूर झालेले वेतन पडताळणीचे काम करून सेवा पुस्तिकेत नोंद घेवून लेखाधिकाऱ्यांची सही व शिक्का मारून देण्यासाठी एका मुख्याध्यापकाकडून चार हजारांची लाच घेताना जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी शिक्षण कार्यालयातील कनिष्ठ लेखा परीक्षकास कार्यालयातच लाच लुचपत विभागाने (एसीबी) सोमवारी दुपारी २ वाजता रंगेहाथ पकडले.
जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील नेहरू विद्यालयातील मुख्याध्यापक ३० जून रोजी सेवानिवृत्त झाले. संस्थेने त्यांना मुख्याध्यापक म्हणून बडती दिली होती. उच्च माध्यमिक शिक्षकांना मागील वर्षी पाचवा वेतन आयोगानुसार नवीन सुधारीत वेतन श्रेणी लागू करण्यात आली. पडताळणी संबधी वेतन निश्चित केलेले सर्व कागदपत्रे ६ जुलै रोजी त्यांनी लेखाधिकारी कार्यालयातील लेखा परिक्षक सुधाकर डुमने यांच्याकडे दिली होती. वेतन निश्चित करण्यासाठी फिस द्यावी लागत नाही. मात्र डुमने यांनी सदर पडताळणीचे काम करून सेवा पुस्तीकेत तसा शिक्का व मारून देण्यासाठी चार हजार रूपयाची मागणी केली.
दरम्यान तक्रारदार शिक्षकाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अॅन्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली. ७ जुलै रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार १३ जुलै रोजी लाचेचा सापळा लावण्यात आला.
दुपारी २ वाजेच्या सुमारास कार्यालयातच लाच स्वीकारताना कनिष्ठ लेखा परिक्षक सुधाकर डुमने यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सदरची कार्यवाही लाचलुचपत विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रवीण मोरे, पो. नि. व्ही. बी. चिंचोले, व्ही. एल. चव्हाण, कर्मचारी अशोक टेहरे, किशोर पाटील, संतोष धायडे, नंदु शेडींवाले, प्रदीप दौडे, अमोल आगलावे, संजय उदगीरकर आदींनी पार पाडली. (प्रतिनिधी)