छेड काढणाऱ्याला बेदम चोपले
By Admin | Updated: July 10, 2014 01:16 IST2014-07-10T01:12:37+5:302014-07-10T01:16:35+5:30
औरंगाबाद : भंगार खरेदी करता करता रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या महिलांना अश्लील हावभाव करीत छेड काढणाऱ्या भंगारवाल्याला नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला.

छेड काढणाऱ्याला बेदम चोपले
औरंगाबाद : भंगार खरेदी करता करता रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या महिलांना अश्लील हावभाव करीत छेड काढणाऱ्या भंगारवाल्याला नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. नंतर त्याला जवाहरनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही घटना बुधवारी सकाळी आकाशवाणी चौकाजवळ घडली.
शेख जावेद शेख मुनीर (३०, रा. संजयनगर, बायजीपुरा) असे त्या भंगारवाल्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, आरोपी शेख जावेद हा गल्लोगल्ली फिरून हातगाडीवर भंगार खरेदीचे काम करतो. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो त्रिमूर्ती चौकाकडून येत होता. त्यावेळी रस्त्याने येणाऱ्या- जाणाऱ्या महिलांची तो अश्लील हावभाव करून छेड काढू लागला. रस्त्याने जाणाऱ्या अशाच एका महिलेची त्याने छेड काढली. या प्रकारानंतर महिलेने त्याला जाब विचारला. हे पाहून आसपासचे नागरिक जमा झाले.
हा महिलेची छेड काढीत असल्याचे समजताच नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी शेख जावेदला जमावाच्या तावडीतून आपल्या ताब्यात घेतले. नंतर महिलेची तक्रार घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.