बसचे ब्रेक निकामी; १२० प्रवासी बालंबाल बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:24 IST2019-02-08T00:24:48+5:302019-02-08T00:24:59+5:30
उंडणगावजवळील घटना : चालकाने प्रसंगावधान राखून रोखली बस

बसचे ब्रेक निकामी; १२० प्रवासी बालंबाल बचावले
उंडणगाव : सिल्लोड ते घटांब्री या एस. टी. बसचे उंडणगावजवळ ब्रेक निकामी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखून हँडब्रेक लावल्याने बसमधील जवळपास १२० प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भंगार बसमुळे ही घटना घडली असून, आगाराने मार्गावर नवीन बस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
सिल्लोड ते घटांब्री ही बस उंडणगाव मार्गे धावते. गुरुवारी बस (क्र. एमएच-२० डी९७०१) घटांब्री येथून विद्यार्थी व प्रवासी असे जवळपास १२० प्रवासी घेऊन जात असताना उंडणगावजवळ बसचे ब्रेक निकामी झाले.
उंडणगावच्या जवळपास १ कि़मी. अंतरावर चालक सुभाष अर्जुन जगताप यांनी ब्रेक लावले असता वाहन थांबलेच नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केले असता ब्रेक लागलेच नाही. तेव्हा ब्रेक निकाली झाल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून हँडब्रेक लावून बस थांबविली. विशेष म्हणजे गुरुवारी उंडणगावचा आठवडी बाजार होता. ज्याठिकाणी बसचे ब्रेक निकामी झाले त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वर्दळ होती. वेळीच चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लावले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.
चौकट
भंगार बसेस रस्त्यावर
उंडणगाव मार्गे बहुतांश भंगार बसेस धावत असून, यामुळे नेहमी नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता ब्रेकच निकामी झाल्याने या बसमधून प्रवास करणारे प्रवासी बालंबाल बचावले. त्यामुळे आगाराने दखल घेऊन या मार्गावर नवीन बस सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही येथील नागरिकांनी दिला आहे.