ऑनलाइनच्या जमान्यातही पुस्तकांची चलती; वाचकांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:46 IST2025-04-23T16:45:15+5:302025-04-23T16:46:03+5:30
जागतिक पुस्तक दिन विशेष: शहरात आहेत ५० वाचनालये, शासकीय ग्रंथालयात २००० साली १२७२ असणारी वाचकांची संख्या आता ९,३२८ वर पोहोचली आहे.

ऑनलाइनच्या जमान्यातही पुस्तकांची चलती; वाचकांमध्ये तरुणांची संख्या लक्षणीय
- प्राची पाटील
छत्रपती संभाजीनगर : जगभरात २३ एप्रिल हा जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. पुस्तके इतिहास आणि भविष्याला जोडणारा दुवा असतात. माणसाच्या जडणघडणीत पुस्तकांचा मोलाचा वाटा असतो. गेल्या काही वर्षांमध्ये छापील पुस्तके वाचण्यापेक्षा ऑनलाइन वाचनाकडे अनेकांचा कल वाढला होता; पण आता मोबाइलचा वाढलेला वापर, डोळ्यांना होणारा त्रास यामुळे पुन्हा एकदा वाचक कोऱ्या पुस्तकांचा गंध मनात भरून घेत, हातात पुस्तक घेऊन वाचताना दिसतोय. शासकीय ग्रंथालयात २००० साली १२७२ असणारी वाचकांची संख्या आता ९,३२८ वर पोहोचली आहे. शहर व परिसरात आजघडीला ५० वाचनालये आहेत. पुस्तकांच्या दुकानात तरुणांची वाढती गर्दीही आशादायक चित्र आहे.
२००० मध्ये छत्रपती संभाजीनगरची लोकसंख्या ८ लाख असताना वाचक १ हजार २७२, म्हणजेच लोकसंख्येच्या मानाने वाचकांची टक्केवारी ०.१५ होती. आता १५ लाख लोकसंख्या असताना वाचक ९ हजार ३२८, लोकसंख्येच्या मानाने वाचकांची टक्केवारी ०.६२ आहे. गेल्या २५ वर्षांची तुलना केल्यास एकूण ०.४७ टक्के वाचकसंख्या वाढली आहे.
शासकीय वाचनालयात २ लाख पुस्तके
छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय विभागीय वाचनालयात २००० मध्ये १२७२ सभासद होते. आता ९ हजार ३२८ सदस्य आहेत. त्यांच्याकडे एकूण ग्रंथसंपदा १ लाख ९८ हजार ५९५ आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण ३९२ वाचनालये आहेत. शहर आणि परिसरात ५० वाचनालये आहेत. जिल्हा ग्रंथालय कार्यालयानुसार, ‘अ’ वर्गाच्या वाचनालयात किमान १५ हजार पुस्तके असावीत, तर ‘ब’ वर्गाच्या वाचनालयांना १० हजार, ‘क’ वर्गाच्या २ हजारांच्या पुढे, ‘ड’ वर्गाच्या वाचनालयाला ३०० च्या पुढे पुस्तके असावीत. जिल्ह्यात केवळ ८ वाचनालये, तर शहरात ५ वाचनालये ‘अ’ वर्गात मोडतात. १०० वर्षांहून अधिक जुन्या बलवंत वाचनालयात ८० हजार ग्रंथांचा खजिना आहे. यामध्ये दुर्मिळातली दुर्मीळ हस्तलिखिते, ज्ञानेश्वरी, दासोपंतांची पासोडी यांचा समावेश आहे.
वाचनालयांना सुगीचे दिवस येतील
कोरोनानंतर पुस्तक वाचणाऱ्या, ग्रंथालयाचे सभासद होणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली. तरुणांचेही प्रमाण वाढलेय. ऑनलाइनच्या जमान्यात वाढलेले डोळ्यांचे दुखणे, मोबाइलचा वाढलेला वापर या पार्श्वभूमीवर आशा पल्लवित करणारे हे चित्र आहे. वाचनालयांना सुगीचे दिवस येतील.
-सुनील हुसे, जिल्हा माहिती अधिकारी