'परीक्षेला बसविले बोगस उमेदवार'; तलाठी होण्याअगोदरच बोगसगिरी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 14:26 IST2021-04-12T14:26:13+5:302021-04-12T14:26:30+5:30
परीक्षा झाल्यानंतर या तिघांसह ११ उमेदवारांचे पोर्टलवर अर्जातील फोटो, स्वाक्षरी आणि प्रत्यक्षात परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या फोटो, स्वाक्षरीत तफावत आढळून आली.

'परीक्षेला बसविले बोगस उमेदवार'; तलाठी होण्याअगोदरच बोगसगिरी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद : तलाठी पदाच्या परीक्षेत स्वत:च्या नावावर दुसऱ्या उमेदवाराला बसविणाऱ्या जिल्ह्यातील तीन जणांविरुद्ध हर्सूल ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले की, समाधान सीताराम भोतकर (२७, रा. हट्टी, ता. सिल्लोड), अंबादास विठ्ठल साबळे (२८, रा. गणेशनगर, सिडको महानगर, वडगाव कोल्हाटी) आणि खुशालसिंग फुलसिंग ठाकूर (३७, रा. संजरपूरवाडी, परसोडा, ता. वैजापूर), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अहमदनगर उपविभागीय महसूल मंडळातील तलाठ्याच्या ८४ रिक्त पदांसाठी एका खाजगी त्रयस्थ संस्थेने ही परीक्षा घेतली होती. महापरीक्षा पोर्टलद्वारे २ ते २६ जुलै २०१९ दरम्यान तलाठी पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी २८ फेब्रुवारी २०१९ रोजी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. ही परीक्षा हर्सूल परिसरातील औताडे कॉम्पलेक्सनजीक असलेल्या ड्रीम लॅण्ड इंग्लिश शाळेत ३ ते ७ जानेवारी २०२० या काळात पार पडली होती. ही परीक्षा पार पडत असताना सीताराम भोतकर, अंबादास साबळे आणि खुशालसिंग ठाकूर यांनी स्वत: परीक्षा देण्याऐवजी त्यांच्या नावावर दुसरे बोगस उमेदवार परीक्षेला बसविले.
परीक्षा झाल्यानंतर या तिघांसह ११ उमेदवारांचे पोर्टलवर अर्जातील फोटो, स्वाक्षरी आणि प्रत्यक्षात परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या फोटो, स्वाक्षरीत तफावत आढळून आली. त्यानुसार ३ एप्रिल रोजी अहमदनगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात तहसीलदार (महसूल) माधुरी आंधळे यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, त्यापैकी तीन उमेदवारांनी हर्सूल भागातील शाळेतून परीक्षा दिल्यामुळे त्यांच्याविरुद्धचा गुन्हा हर्सूल ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सचिन इंगोले करीत आहेत.