धारकुंड तलावात बुडालेल्या तीन तरुणांचे मृतदेह २४ तासानंतर सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 19:44 IST2020-08-10T19:41:10+5:302020-08-10T19:44:12+5:30
रविवारी बनोटी जवळील धारेश्वर येथील पर्यटनस्थळी जळगाव जिल्ह्यातील नऊ तरुण आले होते.

धारकुंड तलावात बुडालेल्या तीन तरुणांचे मृतदेह २४ तासानंतर सापडले
सोयगाव : पर्यटनादरम्यान रविवारी धारकुंड (बनोटी) तलावात बुडालेल्या जळगाव जिल्ह्यातील तीनही तरुणांचे मृतदेह २४ तासांच्या शोध मोहिमेनंतर सोमवारी सायंकाळी सापडले. राहूल रमेश चौधरी (वय २२, रा.हनुमान नगर, अयोध्या नगर) व राकेश रमेश भालेराव (रा.सुप्रीम कॉलनी जळगाव) गणेश सोनवणे (राधानगरी जारगाव जळगाव) असे मृतांची नावे आहेत.
रविवारी दुपारी बनोटी जवळील धारेश्वर येथील पर्यटनस्थळी जळगाव जिल्ह्यातील नऊ तरुण आले होते. तलावात पोहत असताना राहूल चौधरी, राकेश भालेराव, व गणेश सोनवणे पाण्याचा अंदाज न बुडाले. हा प्रकार इतर मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिघांचाही पाण्यात शोध घेतला. गावात माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली. पाण्याची पातळी, अंधार आणि पावसामुळे अडथळा निर्माण होत असल्याने रविवारी रात्री शोध मोहीम थांबविण्यात आली. सोमवारी सकाळी पुन्हा सर्वांनी शोधमोहीम सुरु करण्यात आली.
ठाणे अंमलदार सुभाष पवार, सतीश पाटील दिपक पवार, विकास दुबीले यांनी स्थानिक मच्छीमार, रामदास जाधव, आत्माराम सोनवणे, उपसरपंच सागर खैरनार तसेच ग्रामस्थांच्या सहायाने शोध सुरु केला. दुपारपर्यत दोघांचे मृतदेह हाती लागले. त्यानंतर औरंगाबाद येथून आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना तिसऱ्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात यश आले. पोलिसांनी तिंघाचेही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले. त्यांच्यावर संध्याकाळी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.