अंध विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या मर्जीच्या केंद्रावर
By Admin | Updated: February 22, 2015 00:37 IST2015-02-22T00:33:10+5:302015-02-22T00:37:41+5:30
भालचंद्र येडवे , लातूर बारावीत शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीवर परिक्षा केंद्र देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत लातूर विभागीय

अंध विद्यार्थ्यांची परीक्षा त्यांच्या मर्जीच्या केंद्रावर
भालचंद्र येडवे , लातूर
बारावीत शिकणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीवर परिक्षा केंद्र देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत लातूर विभागीय मंडळाने यंदाही एक पाऊल पुढे टाकले आहे़ राज्यात असा उपक्रम राबविणारे लातूर विभागीय मंडळ हे पहिलेच असून त्यांनीही पहिल्यांदाच राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
लातूर विभागीय मंडळाअंतर्गत असलेल्या नांदेड, लातूर, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात शनिवारपासून बारावीच्या परीक्षेस प्रारंभ झाला़ मंडळांतर्गत असलेल्या तीन जिल्ह्यातून लातूर - ३१ हजार १४३, नांदेड - २७ हजार ८ १७ तर उस्मानाबाद - १५ हजार ३६१ असे एकूण ७४ हजार ३२१ विद्यार्थी या परिक्षेस सामोरे जात आहेत़ विभागात एकूण १७८ परीक्षा केंद्रांसाठी ५७ परीरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ शिवाय, प्रत्येक जिल्ह्यात ८ भरारी पथकेही मुक्रर करण्यात आली आहेत़ तसेच प्रत्येक केंद्रांवर बैठे पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे़ शनिवारी २५ हजार विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर दिला़ तिन्ही जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही़
ऐन परीक्षेच्या कालावधीत गतवर्षी दोन विद्यार्थ्यांच्या वडिलांचे दु:खद निधन झाले होते़ त्याच क्षणी मंडळ अधिकारी त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले़ एवढेच नव्हे तर या दोन्ही विद्यार्थ्यांना धीर देत त्यांचा सहानुभुतीपूर्वक विचार करुन विशेष बाब म्हणून अर्धा-एक तास उशीरा या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मुभाही दिली़
यंदाच्या दहावी, बारावी परीक्षेत अंध विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पॅनल लेखनीसह केंद्र देण्याचा निर्णयही लातूर विभागीय मंडळांच्या बैठकीत घेण्यात आला आहे़ त्यानुसार आता कोणत्याही अंध विद्यार्थ्याला त्याच्या मागणीनुसार कोणत्याही केंद्रावर परीक्षा देता येईल. हा पहिला वहिला नाविण्यपूर्ण उपक्रम मंडळाने यंदापासून हाती घेतला आहे़ या सोबतच कोणत्याही परीक्षा केंद्रांवर भार नियमन करु नये, असे आदेश संबंधीत जिल्हा व विभागाला देण्यात आले आहेत़