गंगाखेड नगराध्यक्षपदी भाजपाच्या जयश्री मुंडे

By Admin | Updated: July 12, 2014 01:12 IST2014-07-12T00:33:54+5:302014-07-12T01:12:35+5:30

गंगाखेड : येथील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवडणूक शुक्रवारी चोख पोलिस बंदोबस्तात पार पडली.

BJP's Jayashree Munde is the President of Gangakhed Municipal Corporation | गंगाखेड नगराध्यक्षपदी भाजपाच्या जयश्री मुंडे

गंगाखेड नगराध्यक्षपदी भाजपाच्या जयश्री मुंडे

गंगाखेड : येथील नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांची निवडणूक शुक्रवारी चोख पोलिस बंदोबस्तात पार पडली. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपाच्या जयश्री मुंडे तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ज्योती काकाणी विजयी झाल्या.
दोन महिन्यांपासून नगराध्यक्षपदाची निवडणूक गाजत होती. पुन्हा एकदा राष्ट्रवादी व काँग्रेसला शह देत गंगाखेड पॅटर्नला यश मिळाले आहे. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिलाताई मधुसूदन केंद्रे यांना ११ तर भाजपाच्या जयश्रीताई रामप्रभू मुंडे यांना १२ मते मिळाली. त्यामुळे भाजपाने नगराध्यक्षपद खेचून आणले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक महत्वाची मानली जात होती. उद्योगपती रत्नाकर गुट्टे, आ. सीताराम घनदाट यांच्या प्रयत्नांमुळे रामप्रभू मुंडे यांना गंगाखेड पॅटर्न राबविण्यात यश मिळाले. डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्याकडे राष्ट्रवादीचे सहा, काँग्रेसचे चार व अपक्ष एक असे ११ नगरसेवक होते. तर माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांच्याकडे भाजपाचे ५, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे ४, घनदाट मित्रमंडळाचा एक असे १२ नगरसेवक होते. उपनरागध्यक्षपदी शिवसेनेच्या ज्योती मनोज काकाणी यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश शिंदे यांनी काम पाहिले. त्यांना तहसीलदार अविनाश शिंगटे, मुख्याधिकारी गणेश चव्हाण यांनी सहकार्य केले. अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर केंगार, पोलिस निरीक्षक उत्तम चव्हाण आदींनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
नगराध्यक्षपद खेचून आणण्यात यश : गुट्टे
केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी येथील नगराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली होती. परंतु, अचानक त्यांचे निधन झाले. त्यानंतर आ.पंकजाताई पालवे यांनीही माझ्यावर विश्वास टाकला व त्यांच्या सहकार्यामुळेच मी गंगाखेड नगराध्यक्षपद खेचून आणून गोपीनाथराव मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली, असे उद्योगपती रत्नाकर गुट्टे यांनी सांगितले. ते म्हणाले, गंगाखेड पोलिस ठाण्यात खोटे गुन्हे दाखल केले असून पोलिसांनी चौकशी करुन ते मागे घ्यावेत, अन्यथा आम्ही आंदोलन करणार आहोत.
अखेर सत्याचा विजय- रामप्रभू मुंडे
गंगाखेड नगराध्यक्षपद हे घरी बसून मिळत नसते. त्यासाठी जनतेची कामे करावी लागतात. ते आम्ही केले म्हणून नगराध्यक्षपद भाजपाला मिळाले. या विजयामुळे सत्याचा विजय झाला, असे माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे यांनी सांगितले.

Web Title: BJP's Jayashree Munde is the President of Gangakhed Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.