भाजपवाल्यांनी नाक रगडून माफी मागावी, अन्यथा जनता टकमक टोकावर नेईल: अंबादास दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 16:56 IST2022-12-06T16:56:27+5:302022-12-06T16:56:55+5:30
दिल्ली दरबारी भाजप नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला

भाजपवाल्यांनी नाक रगडून माफी मागावी, अन्यथा जनता टकमक टोकावर नेईल: अंबादास दानवे
औरंगाबाद: अफझल खानाने शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्या प्रकारे विजापूरच्या दरबारात विडा उचलला होता, त्याच प्रमाणे भाजप नेत्यांनी दिल्ली दरबारी शिवाजी महाराजांच्या बदनामीचा विडा उचलला असल्याचे दिसते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच राज्यातील जनतेसमोर भाजपच्या सर्वांनी नाक रगडून माफी मागावी अन्यथा जनता यांना टकमक टोकावर नेईल, असा इशारा देखील आ. दानवे यांनी दिला.
आ. दानवे पुढे म्हणाले, केवळ राज्यपाल यांनी एकट्यानीच वक्तव्य केले नाही. भाजपाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी वक्तव्य केले आहे. एक त्रिवेदी प्रवक्ता आहेत त्यांनी केले, इथे लाड हे बोले, एक केंद्रीय मंत्री आहेत ते बोलले. या सगळ्या लोकांनी दिल्ली दरबारात छत्रपती शिवरायांच्या बदनामीचा विडा उचलल्याचे दिसत आहे. असे तर छत्रपती शिवाजी महाराजांना काही करता येत नाही. यामुळे भाजपाने हा विडा उचलला आहे. अफझल खानाने विजापूर दरबारात शिवाजी महाराजांच्या विरोधात विडा उचलला होता या घटनेशी आ. दानवे यांनी सातत्याने शिवाजी महाराजांची होत असलेल्या बदनामीच्या घटनांची तुलना करत भाजपवर हल्लाबोल केला. या प्रवृत्तीच्या विरोधात मोर्चा आहे. यांना धडा शिकवण्यासाठी हा मोर्चा असेल. येथून गेलेले उद्योगधंदे, महिलांचा अवमान असे विषय घेऊन आमचा मोर्चा निघणार आहे, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
नाक घासून माफी मागावी, अन्यथा टकमक टोक
छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी ठरवून होत आहे. महाराजांच्या विरोधातील वक्तव्य विषारी असून ठरवून केलेली आहेत. सहज झालेले नाही, हे ठरवून झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला हे राज्यातील लहान मुलांना देखील माहिती आहे. हे कुठे झाल्याचे सांगत आहेत? या सर्वांनी महाराष्ट्राच्या जनेतसमोर मातीत नाक रगडून माफी मागायला हवी. तेव्हा जनता त्यांना माफ करेल. रायगडावर, शिवतीर्थावर किंवा शिवनेरी जाऊन नाक रगडावे अन्यथा जनता यांना टकमक टोकावर नेईन असा इशारा देखील आ. दानवे यांनी दिला.