भाजपने पक्षातील ‘लव्ह जिहाद’ आधी संपवावा : इम्तियाज जलील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 13:56 IST2020-11-26T13:55:27+5:302020-11-26T13:56:08+5:30
भाजपने कायदे करण्यापेक्षा स्वतःच्या नेत्यांवर कारवाई करून दाखवावी.

भाजपने पक्षातील ‘लव्ह जिहाद’ आधी संपवावा : इम्तियाज जलील
औरंगाबाद : भाजपने अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी एकानंतर एक कायदे करण्यास सुरुवात केली आहे. ‘लव्ह जिहाद’ हासुद्धा त्याचाच एक भाग आहे. भाजपमधील मंत्री मुक्तार अब्बास नकवी तसेच शाहनवाज हुसैन या ‘लव्ह जिहाद’ करणाऱ्या नेत्यांवर पक्षाने आधी कारवाई करावी, त्यानंतर देशभरात कायदा आणावा, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधावरी येथे पत्रकार परिषदेत मांडली.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात एमआयएम पक्षातर्फे कुणाल खरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर ते म्हणाले की, भाजप देशप्रेम आणि संविधानाच्या प्रेमावर बोलत नाही. भाजपने कायदे करण्यापेक्षा स्वतःच्या नेत्यांवर कारवाई करून दाखवावी. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांवर खा. जलील यांनी जोरदार टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देताना ज्या लोकांनी टीका केली होती तेच आज निवडणूक रिंगणात उभे आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठाला औरंगाबादेत आणण्यास याच मंडळींनी विरोध केला होता. मात्र, विभाजनासाठी आम्ही निवडणूक लढवतो, असा आरोप आमच्यावर वारंवार करण्यात येतो. बिहारच्या निवडणुकीत आम्ही आमच्या पक्षाची ताकद दाखवून दिली आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचंड मेहनत घेत आहोत आणि प्रामाणिकपणे कामही करीत आहोत. यश आम्हाला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला गौतम खरात, अरुण बोर्डे, शारेक नक्शबंदी यांची उपस्थिती होती.