भाजपने फोडला सेना नेत्यांना घाम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:17 IST2019-03-19T23:16:35+5:302019-03-19T23:17:20+5:30
औैरंगाबाद : शिवसेना-भाजप युती असली तरी भाजपने मंगळवारी पाणी प्रश्नावरून सेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सिडको एन-३, एन-४ भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी मंगळवारी सकाळीच मनपासमोर उपोषण सुरू केले. महापौैरांनी उपोषण मागे घेण्याची खूप विनंती केली.

भाजपने फोडला सेना नेत्यांना घाम...
औैरंगाबाद : शिवसेना-भाजप युती असली तरी भाजपने मंगळवारी पाणी प्रश्नावरून सेना नेत्यांना चांगलाच घाम फोडला. सिडको एन-३, एन-४ भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या मुद्यावर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका माधुरी अदवंत यांनी मंगळवारी सकाळीच मनपासमोर उपोषण सुरू केले. महापौैरांनी उपोषण मागे घेण्याची खूप विनंती केली. मात्र, त्या आपल्या निर्णयावर ठाम होत्या. सायंकाळी मनपा आयुक्तांनी ३० मार्चपर्यंत पाणी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.
निवडणुका जवळ येऊ लागताच युतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत आहे. महापालिकेत आजपर्यंत भाजपने नेहमी सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मनपात शिवसेना-भाजपची पूर्वीपासून युती आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आज भाजपने पाणीप्रश्नाचा मुद्दा उकरून काढला. वॉर्डातील महिला व पुरुषांसह अदवंत यांनी सकाळी १० वाजेपासून उपोषण सुरू केले. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, प्रमोद राठोड आदी यावेळी हजर होते. माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंडपात जाऊन अदवंत आणि नागरिकांची समजूत काढण्याचा बराच प्रयत्न केला. आंदोलकांचे अजिबात समाधान झाले नाही. दुपारी १ वाजता मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक अदवंत यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी नागरिकांनी सिडकोवासीयांना पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी खासदारांच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. काही नागरिकांनी तर आयुक्तांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. सिडको एन ३, एन ४ भागात पुंडलिकनगरच्या जलकुंभावरून पाणी द्यावे, अशी मागणी करून भाजपने पुन्हा सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मंजूर झाले होते. ते काम वर्षभरापासून का होत नाही, असा सवाल काही नागरिकांनी आयुक्तांना विचारला. त्यावर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या काही नगरसेवकांनी (सेना) विरोध केल्यामुळे काम थांबल्याची माहिती दिली. या उत्तराने संतापलेल्या प्रमोद राठोड यांनी मग त्यांच्यावर गुन्हा का दाखल करीत नाहीत, अशी विचारणा केली. शेवटी आयुक्तांनी पाण्याचे समान वितरण करण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत, याची माहिती दिली. आयुक्तांनी ३० मार्चपर्यंत पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.