भाजपकडून छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी १००० इच्छुकांच्या मुलाखती; आता होणार सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:34 IST2025-12-20T19:33:56+5:302025-12-20T19:34:32+5:30
निवडणुकीत खर्च किती करणार? या प्रश्नावरून अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली.

भाजपकडून छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी १००० इच्छुकांच्या मुलाखती; आता होणार सर्वेक्षण
छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात व दिल्लीमधील संस्थांकडून भाजप प्राथमिक पाहणी करणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उर्वरित ११ प्रभागांतील इच्छुक ५०० उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. चिकलठाणा येथील भाजपच्या विभागीय कार्यालयामध्ये सकाळी ८ वाजेपासून दुपारी ३ पर्यंत मुलाखती सुरू होत्या. ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, आ. अनुराधा चव्हाण, माजी महापौर बापू घडमोडे, माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, अनिल मकरिये आदी पॅनल प्रमुखांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. फुलंब्री व पूर्व मतदारसंघ, पश्चिम मतदारसंघातील प्रभागांचा यात समावेश होता.
गुरुवारी १ ते १८ प्रभागांसाठी सुमारे ५०० जणांच्या मुलाखती घेतल्या होत्या. आज दुसऱ्या दिवशी १९ ते २९ या प्रभागांसाठी ५०० जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. भाजपकडून एकूण १४०० जणांनी उमेदवारी अर्ज नेले होते. त्यातील १००० जणांनीच मुलाखती दिल्या. भाजपने प्रत्येक प्रभागातून ८ जणांची नावे निश्चित केली आहेत. या निवडलेल्या इच्छुकांच्या नावानुसार पुढील सहा दिवसांत सर्वेक्षण होऊन किती जागा भाजपने लढाव्यात, याचा प्राथमिक अंदाज बांधला जाणार आहे.
खर्च किती करणार? या प्रश्नावरून नाराजी...
निवडणुकीत खर्च किती करणार? या प्रश्नावरून अनेक इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. पक्षासाठी केलेले काम, निष्ठा या सगळ्या गोष्टींचा मुलाखत घेणाऱ्यांना विसर पडला आहे का? अशी भावना देखील अनेकांनी व्यक्त केली. पक्षनेत्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देताना इच्छुकांना काही वाटले नाही, परंतु खर्चाचा प्रश्न विचारताच अनेकांची विकेट गेली. प्रभाग असल्यामुळे कमी पैशांत निवडणूक होईल, आयोगाने दिलेल्या खर्च मर्यादेतही विजय मिळवता येईल, असा दावाही काही इच्छुकांनी मुलाखतीत केला.
प्रमुख सत्ताधारी पक्ष असल्याने भाजपकडे इच्छुकांची भली मोठी रांग आहे. त्यामुळे मुलाखती घेणाऱ्यांचीही कसोटी आहे. ११ प्रभागांच्या मुलाखती शुक्रवारी तर १८ प्रभागांच्या गुरुवारी झाल्या.