भाजपाकडून बोराळकर
By Admin | Updated: May 24, 2014 02:11 IST2014-05-24T02:05:05+5:302014-05-24T02:11:01+5:30
औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी एक वर्षाच्या विचारमंथनानंतर पक्षाचे मराठवाडा प्रवक्ते शिरीष बोराळकर यांना
भाजपाकडून बोराळकर
औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीने मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी एक वर्षाच्या विचारमंथनानंतर पक्षाचे मराठवाडा प्रवक्ते शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रस आणि भाजपा, अशी थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विजया रहाटकर, प्रवीण घुगे, एकनाथ जाधव यांच्या नावासह उद्योजक सचिन मुळे यांच्याही नावाची चर्चा उमेदवारीसाठी सुरू होती. खा. रावसाहेब दानवे यांनी काल २२ रोजी सचिन मुळे व परिवाराची भेट घेतल्यामुळे त्या चर्चेला उधाण आले होते. मात्र, मुळे यांनी नकार दिल्यामुळे भाजपाने पुन्हा कार्यकर्त्यास उमेदवारी देण्यासाठी चिंतन केले. त्यामध्ये बोराळकर यांचे नाव पुढे आले. खा. गोपीनाथ मुंडे, खा. रावसाहेब दानवे, प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्यावर उमेदवार निवडीची जबाबदारी होती. बोराळकर यांना उमेदवारी दिल्याचे खा.दानवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. माजी आ. श्रीकांत जोशी यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर उमेदवाराची शोधाशोध सुरू झाली. जातीय समीकरणाच्या आधारे उमेदवाराचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत भाजपाने वर्ष घालविले. पक्षाने उमेदवारी देण्यात विलंब केल्यामुळे मतदार नोंदणी करताना इच्छुकांची गोची झाली. विरोधी पक्षाने वर्षभराच्या काळात मिळालेल्या मतदार नोंदणीच्या अभियानात जोरदार काम केले. त्या तुलनेत भाजपा मागेच राहिले आहे.