प्राध्यापकांना बायोमेट्रिक, विद्यार्थ्यांना ७५ टक्के हजेरी बंधनकारक; कुलगुरूंनी घेतला ‘तास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:52 IST2025-06-17T11:51:31+5:302025-06-17T11:52:49+5:30

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारी सुरुवात झाली. यानिमित्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पहिल्याच दिवशी विद्यापीठ, उपकेंद्रातील विभागप्रमुख, प्राध्यापकांची महात्मा फुले सभागृहात बैठक घेतली.

Biometrics for professors, 75 percent attendance mandatory for students; Vice Chancellor warns | प्राध्यापकांना बायोमेट्रिक, विद्यार्थ्यांना ७५ टक्के हजेरी बंधनकारक; कुलगुरूंनी घेतला ‘तास’

प्राध्यापकांना बायोमेट्रिक, विद्यार्थ्यांना ७५ टक्के हजेरी बंधनकारक; कुलगुरूंनी घेतला ‘तास’

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपकेंद्रातील प्राध्यापकांना आठवड्यात ४० तास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. वर्गावर तास घेणे, अभ्यासक्रम वेळेवर सुरू करून पूर्ण करणे, परीक्षा वेळेत घेण्याचे बंधनच कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी घातले. त्याशिवाय प्राध्यापकांना विभागात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली असून, विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थितीशिवाय परीक्षा अर्ज भरता येणार नसल्याची घोषणाही कुलगुरूंनी केली.

विद्यापीठाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवारी सुरुवात झाली. यानिमित्त कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पहिल्याच दिवशी विद्यापीठ, उपकेंद्रातील विभागप्रमुख, प्राध्यापकांची महात्मा फुले सभागृहात बैठक घेतली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांची उपस्थिती हाेती. कुलगुरू म्हणाले, विद्यापीठातील प्रत्येक प्राध्यापकांचे पदोन्नतीसह इतर विषय मार्गी लावले आहेत. त्यामुळे प्राध्यापकांनी शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी काम करावे. प्रशासन विभागात ‘स्मार्ट क्लासरूम’ तयार करून देणार आहे. यापुढे तासिका होत नाहीत. वेळेवर निकाल लागत नाहीत. प्राध्यापक गैरहजर राहतात, या गोष्टी खपवून घेणार नाही. त्यासाठीच प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती नसेल तर संबंधितास परीक्षा अर्जच भरता येणार नाही.

२०२७ मध्ये ‘क्यूएस रँकिंग’
विद्यापीठ २०२७ मध्ये जागतिक पातळीवर गुणवत्ता तपासणाऱ्या ‘क्यूएस रँकिंग’ला सामोरे जाणार आहे. त्यासाठी प्राध्यापकांना प्रत्येक वर्षी दोन संशोधन प्रकल्प व पाच शोधनिबंध प्रकाशित करणे गरजेचे आहे.

‘त्या’ प्राध्यापकांची नावे कुलगुरूंकडे
विद्यापीठातील अनेक विभागांत काही विशिष्ट प्राध्यापक वेळेवर येत नाहीत. विभागात आल्यानंतर तासिकांवर जात नाहीत. गेले तरी उशिरा जातात व लवकर निघून येतात. काही जण स्वत:कडे पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना वर्गावर पाठवितात. तसेच विद्यार्थी कमी असल्यामुळे केबिनमध्येच बोलावून तास घेतात, अशा प्राध्यापकांची यादीच कुलगुरूंकडे पोहोचल्याचे समजते. त्यामुळे कुलगुरू कोणत्याही वेळी संबंधित प्राध्यापकांच्या वर्गांना अचानक भेटी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Biometrics for professors, 75 percent attendance mandatory for students; Vice Chancellor warns