छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील पाच महापालिका निवडणुकीत भाजपने मुसंडी मारली असून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नांदेड याठिकाणी एकहाती सत्ता स्थापन केली आहे. काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत लातूरची गढी राखली आहे. तर परभणीत उद्धवसेनेने करिष्मा दाखवत विधानसभेची पुनरावृत्ती केली आहे. भाजपने छत्रपती संभाजीनगरात दोन्ही शिवसेनेला जोरदार तडाखा देत आपण मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले तर नांदेड आणि जालन्यातील काँग्रेसची सत्ता उद्ध्वस्त केली आहे.
महापालिका निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. भाजपने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड या दोन बड्या शहरांसह जालना या व्यापार-उद्याेगासाठी प्रसिद्ध असलेल्या शहरावर सत्ता मिळविली आहे. या तिन्ही शहरात भाजपने अभूतपूर्व अशी कामगिरी केली. लातूरमध्ये काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीची साथ आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची पुण्याई कामाला आली. परभणीत उद्धवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावत विजय संपादन केला आहे. छत्रपती संभाजीनगरात भाजपचे राज्यातील मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड आणि पक्षाच्या सामूहिक कामगिरीने किमया साधली. ११५ पैकी ५८ जागा जिंकत स्वबळावर महापौर बनविण्याची तयारी केली. शिंदेसेनेचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांना सत्तेपर्यंत पोहोचण्याइतका प्रभाव दाखविता आला नाही. त्यांचे १२ उमेदवार विजयी झाले. तर सातत्याने पराभूत होणाऱ्या उद्धवसेनेची या निवडणुकीत धूळधाण उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी मोठी सभा घेऊनही त्यांच्या पक्षाला केवळ ६ जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगरात ४ जागा मिळविल्या. काँग्रेस पक्ष मात्र या निवडणुकीत धराशायी पडल्याचे चित्र आहे.
चव्हाण, देशमुख यांचे वर्चस्व२०१७ च्या नांदेड मनपा निवडणुकीत काँग्रेसमध्ये असताना खा. अशोकराव चव्हाण यांनी निर्विवाद वर्चस्व स्थापन करत ८१ पैकी ७३ जागा निवडून आणल्या होत्या. आता २०२६ च्या निवडणुकीत ते भाजपमध्ये असून यंदाही त्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करत भाजपला विजय मिळवून दिला आहे. लातूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे ‘विलासरावांच्या आठवणी पुसून जातील’ हे विधान भाजपला भोवले असून विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आ. अमित देशमुख यांनी या संधीचा फायदा घेत काँग्रेसला विजय मिळवून दिला. अशीच किमया जालन्यात माजी खासदार रावसाहेब दानवे आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली असून तिथे भाजपला विजय मिळवून दिला.
एमआयएमची मुसंडीजवळपास सर्व नवखे उमेदवार देऊनही छत्रपती संभाजीनगरात एमआयएमने आपला प्रभाव दाखविला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांची खेळी यशस्वी ठरली. पक्षाचे ३३ नगरसेवक निवडून आले. प्रमुख विरोधी पक्षाचे स्थान एमआयएमने प्राप्त केले.
मराठवाडा : ५ महापालिकाभाजप : ३ - छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जालनाकाँग्रेस- वंचित आघाडी : १, लातूरउद्धवसेना- काँग्रेस: १ : परभणी
Web Summary : BJP dominated Marathwada's municipal polls, securing Chhatrapati Sambhajinagar, Jalna, and Nanded. Congress, with VBA, held Latur. Shiv Sena (UBT) repeated assembly success in Parbhani. MIM gained significantly in Chhatrapati Sambhajinagar.
Web Summary : मराठवाड़ा नगर निगम चुनावों में भाजपा का दबदबा, छत्रपति संभाजीनगर, जालना और नांदेड़ पर कब्जा। कांग्रेस ने वीबीए के साथ लातूर को बरकरार रखा। परभणी में शिवसेना (यूबीटी) ने विधानसभा सफलता दोहराई। छत्रपति संभाजीनगर में एमआईएम को महत्वपूर्ण लाभ।