ट्रॅफिकसाठी मोठा तोडगा; शेंद्रा-बिडकीन-वाळूज इंडस्ट्रील बेल्ट एकत्रीकरणासाठी बायपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 20:14 IST2025-06-14T20:14:02+5:302025-06-14T20:14:32+5:30

शेंद्रा-बिडकीन बायपास रस्ता हा ३५ कि.मी लांबीचा असून, हा प्रस्ताव २०१७ पासून चर्चेत आहे.

Big solution for traffic; Bypass for Shendra-Bidkin-Waluj Industrial Belt integration | ट्रॅफिकसाठी मोठा तोडगा; शेंद्रा-बिडकीन-वाळूज इंडस्ट्रील बेल्ट एकत्रीकरणासाठी बायपास

ट्रॅफिकसाठी मोठा तोडगा; शेंद्रा-बिडकीन-वाळूज इंडस्ट्रील बेल्ट एकत्रीकरणासाठी बायपास

छत्रपती संभाजीनगर : शहराचा वाढता विस्तार व येऊ घातलेले नवे उद्योग पाहता शहराच्या रहदारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शेंद्रा- बिडकीन बायपास रस्त्याच्या तयार केलेल्या प्रस्तावात रस्ता जोडणीच्या नव्या सूचनांसह सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी संबंधित यंत्रणांना दिले. पुढे हाच रस्ता वाळूज उद्योगनगरीला जाऊन मिळेल.

शेंद्रा-बिडकीन बायपास रस्ता हा ३५ कि.मी लांबीचा असून, हा प्रस्ताव २०१७ पासून चर्चेत आहे. या प्रकल्पात धुळे-सोलापूर महामार्ग, समृद्धी महामार्ग, वाळूज औद्योगिक वसाहत, तसेच अहिल्यानगर, पुण्याकडे जाणारा रस्ता या सर्व रस्त्यांना प्रस्तावित मार्गाची जोडणी असणे आवश्यक आहे. या बाबींचा अंतर्भाव करून नवीन प्रकल्प अहवाल तयार करणे गरजेचे आहे. आगामी कालावधीत पूर्वेकडून जालना येथील ड्रायपोर्ट व पश्चिमेकडून वाढवण बंदर हे दोन प्रकल्प पूर्ण होताच या मार्गावरील रहदारीचे, मालवाहतुकीचे प्रमाण वाढेल. या मुद्यांचा विचार करून सुधारित प्रस्ताव सादर होईल.

शेंद्रा-बिडकीन बायपास या रस्त्याच्या कामासंदर्भात शुक्रवारी सावे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापक संघर्ष मेश्राम, अधीक्षक अभियंता अनिकेत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सूर्यकांत गलांडे, ऑरिक सिटीचे उपमहाव्यवस्थापक शैलेश धाबरकर, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, सा.बां. वि.चे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, हिरासिंग ठाकूर आदी उपस्थित होते.

उद्योगांच्या अंतर्गत विकासाचा दुवा
शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज ही छत्रपती संभाजीनगरलगतची महत्त्वाची औद्योगिक केंद्रे आहेत. या ठिकाणी वाढती वाहतूक, औद्योगिक घनता आणि नागरीकरण लक्षात घेता, ‘बायपास मार्ग’ हा महत्त्वाचा पर्याय आहे. हा बायपास एक प्रकारे डीएमआयसी येणाऱ्या उद्योगांच्या अंतर्गत विकासाला मदत करणारा दुवा ठरेल.

जालना रोडला पर्याय
शेंद्रा औद्योगिक वसाहतीला जाण्यासाठी सोलापूर-धुळे महामार्गाची कनेक्टिव्हिटी लांब आहे. त्यामुळे जालना रोडवर औद्योगिक वाहतुकीचा भार पडतो आहे. त्यामुळे शेंद्रा-बिडकीन-वाळूज इंडस्ट्री बेल्ट एकत्रीकरणासाठी बायपास गरजेचा आहे.

का आवश्यक आहे बायपास?
शहरातील जालना रोडला पर्याय असेल. वाहतूक कोंडी कमी होईल.
औद्योगिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग मिळेल.
डीएमआयसीच्या दोन्ही नोड्सला गती मिळेल.
भविष्यातील लॉजिस्टिक हब म्हणून निर्मिती

Web Title: Big solution for traffic; Bypass for Shendra-Bidkin-Waluj Industrial Belt integration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.