मांजा बंदी असतानाही सर्रास विक्री; वटवाघुळ आणि कबुतरला फास; पक्षी मित्रामुळे वाचले प्राण!
By साहेबराव हिवराळे | Updated: January 14, 2023 19:20 IST2023-01-14T19:19:31+5:302023-01-14T19:20:35+5:30
औरंगाबाद शहरात मांजा विक्रीवर बंदी आहे.

मांजा बंदी असतानाही सर्रास विक्री; वटवाघुळ आणि कबुतरला फास; पक्षी मित्रामुळे वाचले प्राण!
औरंगाबाद : बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे वटवाघूळ आणि कबुतर शनिवारी जखमी झाले. या जखमी जिवांना मांजाच्या फासातून मुक्त करीत वैद्यकीय उपचार करण्यात आले.
शनिवारी सकाळी ११ वाजता विभागीय क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल सामन्याच्या वेळी एका कबुतराच्या पायामध्ये मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा अडकलेला खेळाडूंना दिसला. मांजा हळुवारपणे काढून त्याला सर्वांनी जल्लोष करीत हवेत सोडले आणि त्याचे प्राण वाचविले.
यावेळी देवगिरी महाविद्यालयाचे प्रा. राकेश खैरनार, प्रा. गणेश बेटूदे, विभागीय क्रीडा संकुलाचे कर्मचारी संतोष आवचार, प्रा. अमोल पगारे, अक्षय बिरादार, सागर रूपवते, अजय कावळे, अमीन शाह, देवगिरी महाविद्यालयाचे सॉफ्टबॉल खेळाडू संतोष आवचार, लाइफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशनचे सचिव जयेश शिंदे उपस्थित होते.
वटवाघुळाचा कापला पंख...
मांजात अडकलेले वटवाघूळ जखमी अवस्थेत पाहून हडकोतील दक्ष महिला सरिता कुलकर्णी यांनी मानद वन्य जीव सदस्य डाॅ. किशोर पाठक यांच्याशी संपर्क साधला. लगेच पक्षिमित्र मनोज गायकवाड यांना पाठविण्यात आले. त्यांनी जखमी वटवाघुळास डॉ. पाठक यांच्याकडे उपचारासाठी नेले. दोन ठिकाणी फाटलेला पंख कृत्रिम पद्धतीने जोडण्यात आला. शनिवारी त्याच्या प्रकृतीत चांगलीच सुधारला झालेली दिसली. लवकरच त्याच्या पंखात बळ आले की, तो उडण्यास सक्षम ठरेल.
काही जण सण साजरा करण्याच्या नादात आपण कुणाचे तरी जीवन संपवित आहोत, याचेही भान ठेवत नाहीत, अशी खंत डॉ. पाठक यांनी व्यक्त केली.