मोठी बातमी ! गळती होत असलेल्या टँकरमधून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू 

By सुमेध उघडे | Published: February 1, 2024 01:41 PM2024-02-01T13:41:26+5:302024-02-01T13:46:13+5:30

सुरक्षेची उपाययोजना म्हणून १ किलोमीटर परिसरातील घरे आणि आस्थापना रिकामे करण्यात आली आहेत.

Big news! The process of taking gas from the leaking tanker to another tanker is underway | मोठी बातमी ! गळती होत असलेल्या टँकरमधून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू 

मोठी बातमी ! गळती होत असलेल्या टँकरमधून गॅस दुसऱ्या टँकरमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू 

छत्रपती संभाजीनगर: जालना रोडवरील सिडको उड्डाणपुलावर अपघातग्रस्त टँकरमधून गॅस गळती होत असल्याने आपतकालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पहाटे सव्वापाच पासून टँकरमधून गॅस गळती होत आहे. एचपीसीएल कंपनीचे हे टँकर असून कंपनीचे अधिकारी आणि  इर्मजन्सी टीम गॅस गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपायोजना करत आहेत. नुकतेच गळती होत असलेल्या टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे लवकरच या परिसरातील परिस्थिती सुरळीत होण्याची आशा आहे.

चिकलठाणा एमआयडीसी परिसरात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचा डेपो असून, या ठिकाणी टँकरने गॅसचा पुरवठा केला जातो. आज पहाटे सव्वा पाच वाजेच्या सुमारास साडे सतरा हजार लिटर गॅस असलेला टँकर या डेपोकडे जात असताना सिडको उड्डाणपूल सुरू झाल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर उड्डाणपुलाच्या भिंतीवर चढला. त्यानंतर त्यातून गॅस गळती सुरू झाली. घटनेची माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी व पोलीस अवघ्या पाच -दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चारही बाजूने रस्ता बंद केला. टँकरमधून मोठ्या प्रमाणावर गॅस गळती होत असल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून या टँकरवर पाण्याचा मारा केला जात आहे. आत्तापर्यंत ७० टँकर पाण्याचा मारा करण्यात आला आहे. 

परिस्थिती नियंत्रणात, गॅस दुसऱ्या टँकरमध्ये घेणे सुरू
घटनास्थळी एचपीसीएलचे अधिकारी आणि त्यांची इर्मजन्सी टीम कार्यरत आहे. तसेच महापालिका, महसूल आणि पोलिस प्रशासनाचे देखील एक कमांड कंट्रोल उभारण्यात आले आहे. सकाळपासून टँकरमधून दोन टन गॅसची गळती झाल्याचा अंदाज, असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे. दरम्यान, धुळे येथून एचपीसीएलची रेस्क्यू यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.  गळती होणाऱ्या टँकरमधून दुसऱ्या टँकरमध्ये गॅस घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यास अंदाजे दोन ते तीन तास लागण्याची शक्यता आहे.

परिसर केला रिकामा, इतर मार्गावर वाहतूक ठप्प
टँकरमधून गॅस गळतीनंतर सिडको उड्डाणपूल परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सुरक्षेची उपाययोजना म्हणून १ किलोमीटर परिसरातील नागरिकांना घरे आणि आस्थापना रिकामे करण्यात आली आहेत. या परिसरात कोणीही जाऊ नये, वसंतराव नाईक, शिवछत्रपती कॉलेज, कॅनॉट प्लेस, हायकोर्ट, सिडको बसस्थानक या परिसरात घरगुती अथवा कुठलेही ज्वलनशील पदार्थ न पेटवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी केले आहे. शहरातील मुख्य जालना रोडवरील वाहतूक मुकुंदवाडी आणि सेव्हन हिल उड्डाणपूलापासून दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे.इतर मार्गे वाहतूक वळविण्यात आल्याने गजानन मंदिर रोड, पुंडलीक नगर, मुकुंदवाडी, प्रोझोन मॉल रोड, सिडको बसस्टँडजवळ वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहेत.

Web Title: Big news! The process of taking gas from the leaking tanker to another tanker is underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.