मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेत लवकरच बहुचर्चित नोकरभरती होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:52 IST2025-11-04T12:51:32+5:302025-11-04T12:52:18+5:30
नाबार्ड व रिझर्व्ह बँक यांच्या सूचनेनुसार बँकेचा व्यवहार कोअर बँकिंग प्रणाली अंतर्गत संगणकीकृत करण्यात आला आहे.

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेत लवकरच बहुचर्चित नोकरभरती होणार
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लवकरच बहुचर्चित नोकरभरती होणार आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संचालक मंडळाची सभा झाली. सहकार आयुक्त कार्यालयाने लिपिक श्रेणीतील ९४ पदे भरती करण्यास मंजुरी दिलेली आहे. तसेच सहकार आयुक्त कार्यालयाकडे २८६ पदांचा प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्यास मंजुरी प्राप्त होताच भरती प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार राबविण्यात येईल, असे बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे पाटील यांनी जाहीर केले.
नाबार्ड व रिझर्व्ह बँक यांच्या सूचनेनुसार बँकेचा व्यवहार कोअर बँकिंग प्रणाली अंतर्गत संगणकीकृत करण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण १३७ शाखा व मुख्य कार्यालयाचे कामकाज संगणकीकृत पद्धतीने कोअर बँकिंग प्रणालीमध्ये चालू आहे. बँकेने रु. ५ लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण दिलेले असून बँकेच्या आरटीजीएस, एनईएफटी सेवेच्या माध्यमातून ग्राहकांच्या मोठ्या रकमेचा व्यवहारही होत आहे. ग्राहकांच्या खात्यावर झालेल्या व्यवहाराची माहिती मोबाइलवर तत्काळ कळण्यासाठी बँकेने एसएमएस अलर्टची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने खाते पाहण्याची (व्ह्यू ओन्ली) सुविधा सुरू करण्यात आली आहे. महिलांना डीबीटी प्रणालीतून लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँकेमार्फत रक्कम खात्यात जमा करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांची बँक अशी या बँकेची ओळख निर्माण झाली आहे. हळूहळू कर्मचाऱ्यांची संख्या घटत गेली. नोकरभरतीची प्रतीक्षा आहेच. यापूर्वीच्या नोकरभरती गाजलेल्या आहेत. यंदा तरी पारदर्शक पद्धतीने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.