मोठी बातमी! जायकवाडी धरणावर साकारणार १० हजार कोटींतून तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 18:40 IST2025-11-01T18:36:19+5:302025-11-01T18:40:38+5:30
जायकवाडी धरणावर आता 'फ्लोटिंग पॉवर हाऊस'; १२% जलक्षेत्रातून होणार १३४२ मेगावॅट वीजनिर्मिती!

मोठी बातमी! जायकवाडी धरणावर साकारणार १० हजार कोटींतून तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प
छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणातील एकूण जलसाठवण क्षेत्रफळाच्या १२ टक्के पाण्याने व्यापलेल्या भागावर १० हजार कोटींच्या खर्चातून तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यास राज्य शासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय वन व पर्यावरण, पाटंबधारे विभागाने मंजुरी दिल्याची माहिती खा. डॉ. भागवत कराड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मराठवाड्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असून, शेती व उद्योगांना मोठा दिलासा मिळेल, शिवाय हरित वीजनिर्मितीमधील महत्त्वाचे पाऊल पडेल.
भारतातील सर्वांत मोठा फ्लोटिंग सोलार एनर्जी जनरेशनचा हा प्रकल्प असल्याचा दावा करीत कराड यांनी सांगितले, नॅशनल थर्मल पाॅवर काॅर्पोरेशन (एनटीपीसी) या प्रकल्पासाठी १० कोटींची गुंतवणूक करून १३४२ मेगावॅट वीजनिर्मिती करील. ही वीज उद्योग आणि शेतीसाठी स्वस्तात मिळण्यासाठी खरेदी करतानाच शासन व महावितरणमध्ये करार होईल. १ महिन्यात प्रकल्पाच्या कामासाठी भूमिपूजन होईल. २ वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. पर्यावरण मंत्रालयाने या प्रकल्पासाठी दीपक नाईक हे कन्सल्टंट नेमले आहेत. पत्रपरिषदेला बबन नरवडे, कचरू घोडके, दिलीप थोरात आदी उपस्थित होते.
पक्षी अभयारण्यास धोका नाही
जैविविधता आणि पक्षी अभयारण्यास कुठलाही धोका होणार नाही, असा दावा कराड यांनी केला. ३३ हजार ९८९ हेक्टरवर जायकवाडी धरण आहे. त्यातील ४ हजार २५२.९५ हेक्टरवर म्हणजेच १२ टक्के जलक्षेत्रावर तरंगता सोलार ऊर्जा प्रकल्प असेल. २८ टक्के बाष्पीभवन कमी होईल. धरणाच्या दक्षिण दिशेला २ व उत्तर दिशेला १ सोलार पॅनल असतील. ३ कि.मी. अंतरात इको सेन्सेटिव्ह झोन आहे. पाॅवर स्टेशनसाठी ३ ठिकाणी प्रत्येकी ४० एकर जमिनीचे हस्तांतरण झाले आहे. पाटबंधारे आणि एनटीपीसीची याला तत्त्वत: मंजुरी मिळाली.
मासेमारी करणाऱ्यांचे नुकसान नाही
मासेमारी करणाऱ्यांचे या प्रकल्पामुळे नुकसान होणार नाही. कारण फक्त १२ टक्के जलक्षेत्रावर प्रकल्प असेल. उर्वरित ८८ टक्के जलक्षेत्र मासेमारीसाठी मोकळे असेल. पाण्याचा प्रवाह सोडून असलेल्या क्षेत्रावर हा प्रकल्प असेल.
प्रकल्पाची तांत्रिक माहिती:
कोणती संस्था प्रकल्प उभारणार : एनटीपीसी
खर्च किती : १० हजार कोटी
रोजगार निर्मिती : २००
वीजनिर्मिती : १३४२ मेगावॅट
फायदा काय? : २८ टक्के पाण्याचे बाष्प होणार नाही, शेती व उद्योगांना सवलतीत वीज मिळेल.
किती वर्षे वीजनिर्मिती? : २५ वर्षे