मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत केंद्रांवरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अदलाबदली
By राम शिनगारे | Updated: January 22, 2025 12:32 IST2025-01-22T12:24:24+5:302025-01-22T12:32:02+5:30
राज्य मंडळाने विभागीय मंडळास सूचना देऊन काटेकोर अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत,मात्र या निर्णयास शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला आहे

मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षेत केंद्रांवरील शिक्षक, कर्मचाऱ्यांची अदलाबदली
छत्रपती संभाजीनगर : दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची ताटातूट करण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. यानुसार ज्या परीक्षा केंद्रांवर शाळेचे विद्यार्थी असतील, त्या केंद्रांवर त्या शाळेचे शिक्षक व कर्मचारी नेमले जाणार नाहीत. इतर शाळांमधील केंद्र संचालकांसह पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने विभागीय मंडळास दिले आहेत.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी विभागीय मंडळांसह शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात काळजी घेण्याविषयीचा आदेश काढला. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी, तर दहावीची २१ फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. या परीक्षा कॉपीमुक्त घेण्याचे अभियान राबविण्याचे आदेश दिले . या कॉपीमुक्त अभियानात स्थानिक लोकप्रतिनिधी, पालक, विद्यार्थी, नागरिकांना अभियानाची माहिती देणे, विद्यार्थ्यांना कॉपी न करण्याची शपथ देणे, गैरमार्गाचा अवलंब केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देणे, परीक्षा काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, अभ्यासाच्या तयारीची चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविणे, जनजागृती फेरी काढणे, ग्रामसभा बैठक घेऊन त्यात माहिती देण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शिक्षक, कर्मचाऱ्यांवर आक्षेप
परीक्षा पारदर्शक पणे पार पाडण्यासाठी ज्या शाळेतील विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, त्या परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती इतर शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांंमधून कराव्यात, अशा सूचनाही दिल्या आहेत.
...तर शिक्षक बहिष्कार घालणार
कॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली परीक्षा केंद्रांवरील केंद्र संचालक व पर्यवेक्षक यांच्यावर अविश्वास दाखविणारी अट रद्द न केल्यास परीक्षेवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाने दिला. याविषयीचे निवेदन विभागीय मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांना दिले. यावेळी महासंघाचे युनूस पटेल, वाल्मीक सुरासे, मनोज पाटील, सुनील जाधव, सुजाता पवार, विजयमाला मोळवणे यांची उपस्थिती होती.
अंमलबजावणी होणार
राज्य शासनाने परीक्षेसंदर्भात अनेक निर्णय घेतले आहेत. राज्य मंडळाकडून प्राप्त सूचनांची अंमलबजाणी विभागीय मंडळाकडून करण्यात येईल.
-अनिल साबळे, अध्यक्ष, विभागीय मंडळ