मोठा पेच प्रसंग! १२ किमी मुख्य जलवाहिनीवर जीवघेणा रस्ता; तांत्रिक बाबी धाब्यावर
By मुजीब देवणीकर | Updated: December 18, 2024 12:45 IST2024-12-18T12:42:59+5:302024-12-18T12:45:15+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चुकीच्या ठिकाणी जलवाहिनी टाकली का? नॅशनल हायवेने जाणीवपूर्वक जलवाहिनीवर रस्ता तयार केला का? असे सवाल समोर आले आहेत.

मोठा पेच प्रसंग! १२ किमी मुख्य जलवाहिनीवर जीवघेणा रस्ता; तांत्रिक बाबी धाब्यावर
छत्रपती संभाजीनगर : पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत ३९ किमी अंतरापैकी ३४ किमी मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली. त्यावर तब्बल १२ ते १४ किमीपर्यंत चक्क डांबरी रस्ता करण्यात आला आहे. नेमकी ही चूक कोणाची, हा सर्वांत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चुकीच्या ठिकाणी जलवाहिनी टाकली का? नॅशनल हायवेने जाणीवपूर्वक जलवाहिनीवर रस्ता तयार केला का? असे सवाल समोर आले आहेत. दोन शासकीय कार्यालयांच्या वादात शहराच्या पाण्याचा प्रश्न वेठीस धरला जात आहे.
२७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामास २०२० पासून सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत ७४ टक्के काम पूर्ण झाले. जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३९ किमी अंतरात २५०० मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी टाकण्यात येत आहे. ३४ किमी जलवाहिनी टाकण्यात आल्यानंतर नॅशनल हायवेने २० किमी अंतरात जलवाहिनी रस्त्यात (कॅरेज वे) येत असल्याची माहिती औरंगाबाद खंडपीठात सोमवारी दिली. त्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले.
या संदर्भात मंगळवारी ‘लोकमत’ने पैठण रोडवर जलवाहिनीच्या कामाचा आढावा घेतला.
मुदळवाडी ते ढोरकीन
मुदळवाडी येथे अनेक ठिकाणी जलवाहिनीवर रस्ता झाल्याचे निदर्शनास येत होते. त्याचप्रमाणे लोहगाव फाटा येथेही तीच परिस्थिती होती. ढोरकीन गावात रस्ताच अरुंद असल्याने या ठिकाणी कशीबशी जलवाहिनी टाकली. त्यावर सिमेंट काँक्रीट करण्यात आले. अलाना कंपनीच्या समोरील बाजूस जलवाहिनी आल्यानंतर तेथेही डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे.
वर्दळीच्या ठिकाणी जोडण्या
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलवाहिनी टाकताना जिथे रस्ता आहे, गाव आहे, अशा ठिकाणी जलवाहिनीचे पाईप टाकण्याचे टाळले. आता वाहतूक पोलिसांची परवानगी घेऊन जिथे-जिथे जलवाहिनी टाकणे बाकी आहे, तेवढे गॅप भरून काढण्यात येत आहेत. जवळपास चार किमीचे पाईप टाकण्याचे काम ठिकठिकाणी सुरू आहे.
आधी जलवाहिनी नंतर रस्ता
रस्त्याच्या कडेला जलवाहिनी टाकावी, असे आदेश नॅशनल हायवेने १९ एप्रिल २०२२ रोजी एका पत्राद्वारे मजीप्राला दिले. त्यानुसार जलवाहिनी टाकली. अगोदर मनपाने जिथे १२०० आणि ७०० मिमीची जलवाहिनी टाकली त्याच्या बाजूला ही नवीन जलवाहिनी टाकावी हेसुद्धा सांगण्यात आले. जिथे जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले, तेथे नॅशनल हायवेने नंतर रस्ता केला. तब्बल १२ ते १४ किमी अंतरात जलवाहिनीवर डांबरी रस्ता झाला आहे.
२८०० पाईप, वेल्डिंग पूर्ण
२५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची उंची आठ फुटांवर आहे. रुंदीही तेवढीच आहे. एका पाईपची लांबी १२ मीटर आणि वजन १८ टन आहे. अशा पद्धतीचे २८०० पाईप जमिनीत टाकण्यात आले. त्यांना वेल्डिंगही करण्यात आल्याची माहिती मजीप्रा अधिकाऱ्यांनी दिली.
८ एअरव्हॉल्व्ह, ८० बटर फ्लाय व्हॉल्व्ह
मुख्य जलवाहिनीवर ८ ठिकाणी मोठे एअरव्हॉल्व्ह बसविण्यात येतील. प्रत्येक व्हॉल्व्हसाठी १२ बाय १२ आकाराची एक छोटी रूम बांधली जाईल. ८० ठिकाणी बटर फ्लाय व्हॉल्व्ह असतील. हे व्हॉल्व्ह जिथे जलवाहिनी फुटली, तेथे बंद केले जातात. जलवाहिनी रिकामी होऊ नये, म्हणून ही व्यवस्था असते.
हे प्रश्न अनुत्तरित
-२०२२ मध्ये मजिप्राने जलवाहिनीचा पहिला पाईप टाकला, तेव्हाच नॅशनल हायवेने आक्षेप का घेतला नाही?
-३४ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर ‘कॅरेज वे’चा मुद्दा उपस्थित करण्याचे कारण काय?
-जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर दुभाजक टाका, ही विनंती फेटाळून दुभाजक टाकण्याची घाई का केली?
-जलवाहिनीच्या विरुद्ध दिशेला जागा असतानाही जलवाहिनीच्यावर डांबरी रस्ता तयार करण्याचा हेतू काय?
१२९३ कोटी कंपनीला अदा
नवीन पाणीपुरवठा योजनेत आतापर्यंत जेवढे काम झाले, त्यानुसार जीव्हीपीआर कंपनीला १२९३ कोटी रुपये अदा करण्यात आले. मजीप्राकडे आणखी ३२० कोटी रुपये शिल्लक आहेत. योजनेत मनपाला ८२२ कोटी रुपयांचा वाटा टाकणे अद्याप बाकी आहे.
मॉर्थच्या गाईडलाईनचे उल्लंघन
मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ॲन्ड हायवेने (मॉर्थ) ठरवून दिलेल्या गाईडलाईन्सचे उल्लंघन स्थानिक अधिकाऱ्यांकडून झाले. एखाद्या ठिकाणी रस्त्याच्या खाली जलवाहिनी येत असेल तर तेथे काँक्रीटचे ‘डक’ तयार करावे, असे निर्देश आहेत. पैठण रोडवर तर जलवाहिनीवर चक्क डांबरी रस्ता करण्यात आला आहे.
- दीपक कोळी, कार्यकारी अभियंता, मजीप्रा.