मोठा निर्णय! MIDC चे ' रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर' छत्रपती संभाजीनगरमध्ये
By बापू सोळुंके | Updated: September 26, 2025 12:42 IST2025-09-26T12:42:01+5:302025-09-26T12:42:51+5:30
हे सेंटर पाच वर्षांसाठी एका संस्थेला चालविण्यास देण्यात आले आहे. सुमारे ७ हजार विद्यार्थी यात शिकतील.

मोठा निर्णय! MIDC चे ' रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर' छत्रपती संभाजीनगरमध्ये
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये ६० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक विविध नामांकित कंपन्यांनी केली आहे. आणखी बऱ्याच कंपन्या येण्यास उत्सुक आहेत. या उद्योगांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी एमआयडीसी छत्रपती संभाजीनगरमध्ये रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी रात्री ११:३० वाजता पत्रकार परिषदेत केली.
मराठवाड्यात अतिवृष्टीने उद्योगांचे व शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उद्योगमंत्र्यांनी गुरुवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. आ. विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, एमआयडीसीचे मुख्य अभियंता बाळासाहेब झांजे, कार्यकारी अभियंता आर.डी. गिरी, ऑरिक सिटीचे अरुणकुमार दुबे, सीएमआयएचे अध्यक्ष उत्सव माछर आणि पदाधिकारी, मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड, राहुल मोगले, मनीष अग्रवाल, राजेंद्र चौधरी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आढावा बैठकीनंतर त्यांनी लोकमत प्रतिनिधीशी संवाद साधला. ते म्हणाले की, येणाऱ्या मोठ्या उद्योगांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी एमआयडीसीकडून कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येत आहे. याला रतन टाटा यांचे नाव देण्यात येत आहे. हे सेंटर पाच वर्षांसाठी एका संस्थेला चालविण्यास देण्यात आले आहे. सुमारे ७ हजार विद्यार्थी यात शिकतील.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीच्या संलग्न भागात गावात, शेतात पाणी शिरल्याचे प्रकार घडले. ते भविष्यात घडू नयेत, यासाठी तात्काळ उपाययोजना राबवा. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करा, असे निर्देश सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.
उद्याेगमंत्री आज करणार नुकसानीची पाहणी
शुक्रवारी आपण नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करणार आहोत. शिवाय शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील अनेक ठिकाणच्या उद्योगांचे नुकसान झाले आहे. शिवाय एमआयडीसीतील रस्ते खराब झाले, याचा आढावा घेतल्याचे ते म्हणाले.