मोठा बदल! शहानूरमियाँ दर्गा परिसरातील बाजार सोमवार ऐवजी आता रविवारी भरणार
By मुजीब देवणीकर | Updated: November 20, 2023 19:37 IST2023-11-20T19:37:12+5:302023-11-20T19:37:21+5:30
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय

मोठा बदल! शहानूरमियाँ दर्गा परिसरातील बाजार सोमवार ऐवजी आता रविवारी भरणार
छत्रपती संभाजीनगर : शिवाजीनगर येथे भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने बीड बायपासकडे जाणारी वाहतूक संग्रामनगर उड्डाणपुलाकडे वळविण्यात आली आहे. या रस्त्यावर २४ तास वर्दळ वाढली आहे. त्यातच सोमवारी शहानूरमियाँ दर्गा परिसरात बाजार भरल्यावर वाहतूककोंडीत भर पडत आहे. त्यामुळे महापालिकेने सोमवारी भरणारा बाजार रविवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहानूरमियाँ दर्गा चौकात मागील अनेक वर्षांपासून महापालिका सोमवारचा बाजार भरवीत आहे. पूर्वी काही व्यापारी बाजारात कमी आणि रस्त्यावर जास्त बसत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. नागरिकांच्या तक्रारींचा ओघ लक्षात घेता घेत महापालिकेने सोमवारचा बाजार शहानूरमियाँ दर्गा चौकालगत असलेल्या महापालिकेच्या जागेवर हलविला. सध्या या ठिकाणी जागा देखील अपुरी पडत असून, अनेक व्यापारी मुख्य रस्त्यावर दुकाने थाटतात. त्यातच बीड बायपासकडे जाणारा शिवाजीनगरचा मार्ग १ वर्षासाठी ऑक्टोबर २०२४ पर्यंत बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बीड बायपासकडे जाणारे नागरिक संग्रामनगर उड्डाणपुलावरून ये-जा करत आहेत.
सोमवारच्या दिवशी या भागात वाहतुकीची कोंडी होऊन लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बाजार रविवारी भरविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवड्यात सोमवारऐवजी रविवारीच भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांना जावे लागणार आहे. रविवारी जाफरगेट भागात बाजार भरविला जातो. आता शहानूरवाडी येथील बाजार रविवारीच भरणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी येणारे व्यापारी एकच असतात. त्यामुळे व्यापाऱ्यांची देखील कोंडी होणार आहे.