महामॅरेथॉनच्या आधी उद्या रंगणार ‘बिब एक्स्पो’चा सोहळा; शुल्क भरल्याची पावती आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 18:28 IST2024-12-13T18:27:03+5:302024-12-13T18:28:43+5:30
लोकमत भवन येथील हॉलमध्ये या एक्स्पोला शनिवारी सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे.

महामॅरेथॉनच्या आधी उद्या रंगणार ‘बिब एक्स्पो’चा सोहळा; शुल्क भरल्याची पावती आवश्यक
छत्रपती संभाजीनगर : लोकमत महामॅरेथाॅनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कधी एकदा रविवार उजाडतो आणि आम्ही महामॅरेथॉनमध्ये सहभागी होतो, असेच सर्व विचार धावपटूंच्या मनात सुरू असतील. महामॅरेथॉनच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी (दि. १४) लोकमत समूहातर्फे बिब एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत भवन येथील हॉलमध्ये या एक्स्पोला शनिवारी सकाळी १० वाजता सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंना या एक्स्पोत ‘रनर किट’ दिले जाणार आहे. रनर किट परिधान करूनच धावपटूंना महामॅरेथॅानमध्ये सहभागी होता येईल. ३ कि.मी., ५ कि.मी., १० कि.मी. आणि २१ कि.मी.साठी वेगवेगळ्या रंगांचे रनर किट असणार आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रनर किट वाटप केले जाणार आहे. दिलेल्या वेळेच्या आताच धावपटूंनी रनर किट घेण्यासाठी यावे. ‘लोकमत भवन’मध्ये मागील गेटने सर्वांना प्रवेश दिला जाणार आहे.
बिब एक्स्पोमध्ये धावपटूंना महामॅरेथॉनसाठी प्रोत्साहन देण्यासाठी ‘रॉक बँड’चे आकर्षण असणार आहे. आरोग्यदायी विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांचे विशेष सत्र असणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या टिप्स जेणेकरून धावपटूंना धावण्याआधी व धावताना व नंतर ते उपयोगी ठरतील.
महामॅरेथॉनची शुल्क भरल्याची पावती आवश्यक
शनिवारी ‘बिब एक्स्पो’मध्ये येणाऱ्या धावपटूंनी येताना सोबत शुल्क भरल्याची पावती आणणे आवश्यक आहे. शुल्क भरल्याची पावती दाखविल्यावरच धावपटूंना रनर किट दिले जाणार आहे.